पावसामुळे पिकाचे नुकसान : एक महिन्यापर्यंत दर चढेच राहणार : केरळमध्ये 113 रुपये प्रतिकिलो दर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
देशातील बहुतांश ठिकाणी टोमॅटोचे भाव कमी होणार नसल्याचा अनुमान आहे. सध्या देशातील बहुतांश बाजारांमध्ये टोमॅटोचा भाव 100 रुपये प्रतिकिलोपेक्षा अधिक झाला आहे. ग्राहक विषयक विभागानुसार सध्या केरळच्या एर्नाकुलममध्ये टोमॅटो सर्वाधिक दराने विकला जात आहे. तेथील दर 113 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. टोमॅटोचा वापर जवळपास सर्वच घरांमध्ये स्वयंपाकाकरता होत असल्याने दरवाढीची झळ सर्वसामान्यांना बसत आहे. मुंबईत टोमॅटोचा किरकोळ बाजारातील दर 80 रुपये प्रतिकिलोच्या आसपास आहे. मे महिन्यात उत्तरप्रदेश, महाराष्ट्रासमवेत अनेक राज्यांमध्ये टोमॅटो 2-5 रुपये प्रति किलो दराने विकला जात होता. टोमॅटोचा दर वाढण्यामागे अतिवृष्टी कारणीभूत ठरली आहे. पावसामुळे टोमॅटोच्या पिकाला नुकसान पोहोचले असून यामुळे पुरवठा घटला आहे. त्यापूर्वी उष्णतेच्या लाटेमुळे भाज्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते. पुढील एक महिन्यापर्यंत टोमॅटोचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर दर हळूहळू पूर्वपदावर येतील असे इंदोरमधील एका व्यापाऱ्याने म्हटले आहे. दिल्लीमध्ये 70-100 रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटो विकला जात आहे. मध्यप्रदेशच्या बाजारात टोमॅटो 80 ते 100 रुपयांदरम्यान मिळत आहे. तर उत्तरप्रदेशात 80-100 रुपये आणि राजस्थानात 90-110 रुपये आणि पंजाबमध्ये 60-80 रुपयांना एक किलो टोमॅटो मिळत आहे. पावसामुळे टोमॅटोच नव्हे तर अन्य भाज्याही महागल्या आहेत.
दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक
नॅशनल हॉर्टिकल्चरल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशननुसार चीननंतर भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा टोमॅटो उत्पादक देश आहे. भारतात सुमारे 7.89 लाख हेक्टर क्षेत्रातून सुमारे 2 कोटी टन टोमॅटोचे उत्पादन घेतले जात आहे. तर चीन 5.6 कोटी टन उत्पादनासह पहिल्या स्थानावर आहे. भारतात 2021-22 मध्ये 2 कोटी टनापेक्षा अधिक टोमॅटोचे उत्पादन झाले हेते. भारतात मध्यप्रदेश हे टोमॅटोचे सर्वाधिक पीक घेणारे राज्य आहे. यानंतर आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा आणि गुजरातचा क्रमांक लागतो.









