अध्याय दहावा
असुरी स्वभावाचे लोक समोरच्याला त्रास देण्यात धन्यता मानतात तर राक्षसी स्वभावाचे लोक सगळ्या समाजाला कसा त्रास देता येईल ह्यावर विचार करून त्याप्रमाणे कृती करत असतात. त्यासाठी ते असुरी स्वभावाच्या दुर्गुणांचा कळस गाठतात असं म्हंटलं तरी चालेल. स्वत:चं महत्त्व वाढवण्याच्या नादात ते हळूहळू इतरांचं जेव्हढं म्हणून वाईट करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करतात.
जेणेकरून इतरांनी त्यांना भिऊन का होईना त्यांचं मोठेपण मान्य करावं अशी त्यांची इच्छा असते. स्वत:चं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या नादात ते ईश्वरालासुध्दा जुमानत नाहीत. त्यांनी यदाकदाचित काही पुण्यकर्म केले असल्यास त्या प्रमाणात स्वर्गसुख भोगून झाल्यावर, त्यांची रवानगी अशुभ योनीत होत राहते. इतकेच नव्हे तर त्यांच्या कुकर्माच्या प्रमाणात ते नरकयातना भोगतात. पुढे बाप्पा सांगतात की, तामसी स्वभावाचे लोक असह्य दु:ख भोगण्यासाठी कायमचे रौरव नरकात रवाना केले जातात. हे सगळं लक्षात घेऊन ते शहाणे झाले तर ठीक, अन्यथा ते करत असलेल्या पापाचरणामुळे ते अधिकाधिक अधोगतीला जातात पण जे यातून सावरतात त्यांना चांगली गती प्राप्त होते.
दैवी, असुरी आणि राक्षसी स्वभावाच्या लोकांच्याबद्दल सांगून झाल्यावर पुढील श्लोकात भक्तीबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगताना बाप्पा म्हणतात माझ्याकडून काहीतरी मिळवण्यासाठी माझी सकाम भक्ती खूप लोक करतात पण माझ्यावर मनापासून प्रेम करून निरपेक्ष भक्ती करणे ही कठीण बाब आहे.
लभन्ते स्वर्गतिं यज्ञैरन्यैर्धर्मैश्च भूमिप ।
सुलभास्ताऽ सकामानां मयि भक्तिऽ सुदुर्लभा ।। 15 ।।
अर्थ- हे भूपा, यज्ञांनी व इतर धर्मकृत्यांनी ते स्वर्ग मिळवतात. इच्छायुक्त कर्म करणाऱ्यांना स्वर्गादि गती सुलभ आहेत पण माझे ठिकाणी भक्ति जडणे दुर्लभ आहे.
विवरण- ईश्वराची भक्ती करणारे पुष्कळ आहेत पण बहुतांश भक्तांना त्या बदल्यात काही ना काही अपेक्षा असतात आणि अपेक्षा आली की, त्यांनी केलेली ईश्वराची भक्ती हा देवघेविचा मामला बनतो. थोडक्यात लोक भक्तीला व्यवहार समजून त्याप्रमाणे वर्तन करतात. संत मंडळी म्हणतात, भक्तीच्या माध्यमातून देवावर निरतिशय प्रेम करा म्हणजे तोही तुमच्यावर प्रेम करू लागेल. त्याच्या तुमच्यावरील प्रेमातून तुम्हाला जो आनंद मिळेल तो अवर्णनीय असेल. देवाजवळ तुम्ही एखादी गोष्ट मगितलीत तर तुमच्यावरच्या प्रेमापोटी ती वस्तू तो तुम्हाला देईल, नाही असं नाही पण ती गोष्ट जुनी झाली की, तुमच्यादृष्टीने त्यातला आनंद संपेल व मग पुन्हा तुम्ही नवीन गोष्ट मिळवण्यासाठी ईश्वराची भक्ती करू लागाल आणि ही न संपणारी साखळी आहे, जी आयुष्याच्या अंतापर्यंत चालू राहील.
स्वर्गप्राप्तीसाठी खूप पुण्यकर्मे, तपसाधना करून साधक देवाकडून स्वर्गप्राप्तीची अपेक्षा करतात त्याप्रमाणे तो त्यांना मिळतोही पण त्यांचा पुण्यसंचय संपत आला की, त्यांचा पृथ्वीवर पुनर्जन्म होतो.
लोक म्हणतात की, देव हा आपल्या वडिलांच्यासारखा आहे मग आपल्याला हवी असलेली गोष्ट त्यांच्याकडं मागायची नाही तर कुणाकडे मागायची आणि वडिलांच्याकडे मागायचा आपल्याला हक्क असतो. मग देवाकडे मागितलं तर बिघडलं कुठं असं म्हणून भक्त आपल्या मागण्यांचं समर्थन करतात. त्यावर संत मंडळी असं सांगतात की, देव आपल्या आईवडिलांप्रमाणे आहे हे अगदी बरोबर आहे पण आईवडिलांना मुलाच्या गरजा माहीत असतात आणि ते त्यांची वेळोवेळी पुर्तताही करतात. अगदी लहान मुलाला तर बोलायलाही येत नसतं पण आईवडील त्याच्या गरजा ओळखून त्या पुरवतात. त्याप्रमाणे देव आपल्या भक्तांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर असतो.
क्रमश:








