अध्याय चौथा
बाप्पा म्हणाले, शरीरात आकलन, मलविसर्जन, अन्नपचन, रक्ताभिसरण आणि मानसिक व बौद्धिक सुधारणा ही कार्ये चालूच असतात. प्राणायामने त्यांना स्वत:च्या अधिकारात आणले जाते. ह्या क्रियांवर प्राणायामच्या माध्यमातून ताबा मिळवला तर एकाग्रता साधणे सोपे जाते. साधकाची शारीरिक क्षमता वाढते. साधक प्राणायामचा अभ्यास करू लागला की, चित्तातील सत्वगुणावर रज आणि तम गुणाचे असलेले पांघरूण काढले जाते. प्राण निग्रहाने इंद्रियांचे सर्व दोष जळून जातात.
इंद्रियांची विषयांची ओढ कमी होते. श्वास घेणे आणि सोडणे यांची संख्या सम राहिली तर प्रकृती चांगली राहून मन साम्यावस्थेत राहते. अशाप्रकारे मन स्थिर होणे मोक्षप्राप्ती होण्यासाठी आवश्यक आहे. प्राणायामचे तीन प्रकार आहेत असं त्यातील जाणकार मुनी सांगतात. बारा वर्णांनी होणारा प्राणायाम ‘लघु’ होय. चोवीस अक्षरांचा प्राणायाम ‘मध्यम’ तर छत्तीस ऱ्हस्व अक्षरांचा प्राणायाम ‘उत्तम’ असतो. प्राणायामच्या अभ्यासाने इडा व पिंगला या नाड्यातील मार्ग मोकळा होतो. ऊर्ध्व गमन करणारा प्राण व अधोगमन करणारा अपान वायू या दोन्ही वायूंची गती बंद होऊन ते उदरामध्ये स्थिरावतात. हे स्थिर होणं सिद्ध झालं की, प्राणायम करण्याचे फायदे मिळू लागतात. प्राण आणि अपान यांना स्वाधीन करून घेणे म्हणजे वाघ, सिंह यांना मवाळ करण्यासारखं आहे असं बाप्पा पुढील श्लोकात सांगतात.
सिहं शार्दूलकं वापि मत्तेभं मृदुतां यथा ।
नयन्ति प्राणिनस्तद्वत्प्राणापानौ सुसाधयेत् ।। 30 ।।
अर्थ-ज्याप्रमाणे वाघ, सिंह अशा हिंस्त्र प्राण्यांना आटोक्यात आणून मवाळ बनवतात त्याप्रमाणे प्राण व अपान ह्यांना आटोक्यात आणावे.
विवरण-नाभीमुलाच्या ठिकाणी प्राण आणि अपान वायू स्थिर करणे म्हणजे प्राणायाम हे आपल्याला माहित झाले आहे. हे स्थिर केलेले वायू अधिक काळ रोधण्याचा अभ्यास करावा हा अभ्यास योग्य पद्धतीने होण्यासाठी निष्णात सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली हे वायूसाधन करावे. प्रत्येक प्राण्याचे श्वास ठरलेले असतात. तेवढे श्वास घेऊन झाले की, त्याचे आयुष्य संपते. म्हणून एखादा मनुष्य गेल्यावर काहीवेळा म्हणतात की, अमुक दिवशी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. साप मिनिटाला केवळ दोन वेळा श्वासोच्छ्वास करतो. त्याचे आयुष्य चारशे ते पाचशे वर्षे असते तर मनुष्य दर मिनिटाला चौदा ते पंधरा वेळा श्वासोच्छ्वास करतो आणि शंभर वर्षे जगतो. कुत्रा मिनिटाला पस्तीस ते चाळीस वेळा श्वासोच्छ्वास करत असल्याने केवळ बारा वर्षे जगतो. थोडक्यात दर मिनिटाला श्वासोच्छ्वास जेव्हढे कमी तेव्हढे आयुष्य जास्त. प्राणायामने श्वासोच्छ्वास नियंत्रित होतात. शरीराच्या अवयवांची कार्यक्षमता वाढून मेंदू तल्लख होतो. वृत्ती समाधानी होते. आत्मविश्वास वाढतो. भीती नष्ट होते. चित्त एकाग्र होऊन ध्यानधारणा सुलभ होते. म्हणून बाप्पा सांगत आहेत की, ज्याप्रमाणे वाघसिंहासारखे हिंस्त्र प्राणीसुद्धा मवाळ करतात. त्याप्रमाणे माणसाने प्राण अपानांची स्वाधिनता साधावी पण असं सांगत असताना बाप्पा प्राण अपानांची स्वाधिनता साधायचं काम किती अवघड आहे हे त्याची तुलना वाघसिंहाना मवाळ करण्याच्या कामाशी करतात. यावरून माणसानं काय तो बोध घ्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे. प्राणायामच्या माध्यमातून श्वासांचे प्रमाण नियंत्रित करून आजही कित्येक तपस्वी शेकडो वर्षे जगून तपश्चर्या करत असतात. हा अभ्यास तज्ञ अशा योगगुरूंच्या मार्गदर्शनाखाली करावा अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. त्यातील पूरक, रेचक आणि कुंभक हे तीन प्रकार साधले की, योगाभ्यासासाठी ते पुरेसे आहेत असे योगशास्त्र सांगते.
क्रमश:








