वीज समस्येवर वेळीच तोडगा काढावा : विरोधकांची एकमुखी मागणी,तीन महिन्यांत निविदाप्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन
प्रतिनिधी /पणजी
राज्यात एकतर उद्योग येत नाहीत, आणि जे आहेत ते सोडून जाण्याच्या विचारात आहेत. यामागे अनेक कारणे असली तरी सुरळीत वीज नसल्यामुळे होणारे नुकसान हे प्रमुख कारण आहे. ही गंभीर समस्या असून त्यावर वेळीच उपाययोजना न आखल्यास त्याचे थेट परिणाम बेरोजगारी वाढण्यात होतील. त्याचबरोबर गोव्यातील उद्योग क्षेत्राबाबत देशात नकारात्मक संदेश जाईल, असा इशारा आमदार विजय सरदेसाई यांनी दिला.
राज्यातील सध्याच्या वीज स्थितीसंबंधी सोमवारी विधानसभेत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यावेळी सरदेसाई बोलत होते. या सर्व प्रश्नांचे एकत्रित उत्तर देताना वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पुढील तीन ते सहा महिन्यांच्या आत राज्यातील वीज व्यवस्थेचा दर्जा वाढविण्याच्यादृष्टीने निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले. आवश्यक त्या सर्व ठिकाणी जादा क्षमतेचे वीज ट्रान्स्फॉर्मर्स बसविण्यात येतील. त्यानंतर औद्योगिक तसेच खासगी वापरासाठीही सुरळीत वीज उपलब्ध होईल, असे ढवळीकर पुढे म्हणाले.
यातील प्रमुख प्रश्न विरोधी पक्षनेता मायकल लोबो यांनी उपस्थित केला होता. आपल्या मतदारसंघासह शेजारील शिवोली तसेच साळगाव या किनारी भागातील सर्व मतदारसंघात रोज दहा ते पंधरावेळा वीजपुरवठा ठप्प होतो. त्यामुळे लोक हतबल झाले आहेत. खास करून मोठी हॉटेल्स, कॉटेजीस, गेस्ट हाऊस यांच्यासह अन्य संबंधित उद्योगांचे प्रचंड नुकसान होत आहे. यातील प्रत्येक बडय़ा आस्थापनाने स्वतःसाठी जनरेटरची व्यवस्था केलेली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर हे सर्व जनरेटर्स चालू करण्यात येतात. त्यामुळे वीज तर मिळतेच. परंतु डिझेलवर चालणाऱया या जनरेटरमधून मोठय़ा प्रमाणात निघणाऱया धुरामुळे सर्वत्र प्रदूषण होते. शिवाय ही वीज सुमारे 40 रुपये प्रती युनिट एवढय़ा प्रचंड महाग खर्चात वापरावी लागते, अशी माहिती त्यांनी दिली.
त्यावेळी बोलताना श्री. सरदेसाई यांनी राज्यातील एकूणच वीज स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. अनेक औद्योगिक वसाहतींमध्ये तर बिकट स्थितीमुळे उद्योजक हतबल झाले आहेत. उद्योग चालविण्यासाठी त्यांना जनरेटरचा वापर करावा लागतो, त्यासाठी प्रचंड खर्च येतो. त्यामुळे गोव्यात व्यवसायसुलभ वातावरण नसल्याची त्यांची भावना झाली असून यापैकी काही उद्योजक नुकतेच आपणास भेटण्यास आले होते. आपली व्यथा मांडताना त्यामधील काहीजण गोव्यातून गाशा गुंडाळण्याच्या मनःस्थितीत असल्याचे जाणवले अशी माहिती सरदेसाई यांनी दिली.
‘शहाजहान’ पद्धतीचा अवलंब करा, सरदेसाईंचा मार्मिक टोमणा
त्यासंबंधी उदाहरण देताना त्यांनी कुंडई औद्योगिक वसाहतीतील एक प्रसिद्ध कंपनी लवकरच बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रत्येक गोष्ट टेंडरवर आधारून करण्यात येऊ लागली तर ती सर्व प्रक्रिया वेळकाढूपणाचीच ठरणार असल्याचे ते म्हणाले. मंत्र्यांनी सहा महिन्यांत सर्व परिस्थिती सुधारण्याचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात ते कितपत यशस्वी होतील याबद्दल साशंतका व्यक्त करताना सरदेसाई यांनी सरकारने काही प्रकरणात ‘शहाजहान’ पद्धतीचा अवलंब करावा, असा मार्मिक टोमणा हाणला. त्यांचा उंगलीनिर्देश कला अकादमीच्या दुरुस्तीकामावरून होता हे सर्वांच्या लक्षात आल्यामुळे सभागृहात हशा पिकला.
डिलायला लोबो, केदार नाईक यांनीही मांडल्या वीज समस्या
आमदार डिलायला लोबो आणि केदार नाईक यांनीही आपापल्या मतदारसंघातील वीज समस्या मांडल्या. वारंवार खंडित वीज पुरवठय़ामुळे लोक हैराण झाले असून आमदार या नात्याने त्यांचा रोष ओढवून घ्यावा लागतो. त्यामुळे सरकारने त्वरित लक्ष घालून समस्या सोडवावी, अशी मागणी त्यांनी केली.
वेर्णा, थिवी उपकेंद्राचे काम लवकरच : मंत्री ढवळीकर
या सर्व प्रश्नांना उत्तर देताना वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी वेर्णा वीज उपकेंद्रासाठी 15 ऑगस्टनंतर तर थिवी उपकेंद्राचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यापूर्वी जेव्हा जेव्हा उद्योगांना वीज समस्येचा सामना करावा लागला तेव्हा आम्ही अतिरिक्त वीज खरेदी केली. लवकरच आम्ही कुंडईही अपग्रेड करणार आहोत, असे ते म्हणाले. साळगावात 220 केव्ही स्टेशन उभारण्यासाठी नव्याने निविदा काढण्यात येतील. पुढील तीन महिन्यांत त्यासाठी निविदा काढण्यात येईल. मात्र हे सर्व सीडब्ल्यूसी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूनच करण्यात येईल, असेही ढवळीकर यांनी सांगितले.