एपीके फाईलच्या माध्यमातून लूट : ऑटो डाऊनलोड सेटिंग नका करू, सायबर गुन्हेगारांकडून सोप्या मार्गाचा अवलंब
बेळगाव : बेळगाव येथील एका तरुणाला दिल्लीमधून फोन येतो. नोकऱ्या देतो म्हणून अनेक बेरोजगार तरुणांकडून तुम्ही पैसे घेतले आहात. एक तर त्यांना नोकऱ्या मिळवून द्या नाही तर त्यांनी दिलेले पैसे परत करा नहून तुमचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला जाईल, असे सांगितले जाते. त्यांच्यावर विश्वास ठेवून आता तुम्हीच मला वाचवा अशी भूमिका तो युवक घेतो. सध्या पाच-सहा लाख रुपये आमच्या खात्यावर पाठवून द्या, नंतर काय करायचे बघू, असे पलीकडून सांगितले जाते. तीनवेळा प्रत्येकी 2 दोन लाख रुपयांप्रमाणे हा युवक दिल्लीतून फोन करणाऱ्यांना 6 लाख रुपये पाठवतो.
तरीही पैशासाठी त्यांचे फोन सुरूच आहेत. बेळगाव येथील एका चुन्याच्या व्यापाऱ्याला 18 लाख रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. दुबई येथील एका कंपनीकडून हा व्यापारी चुना मागवतो. त्याच कंपनीच्या नावे बनावट ई-मेल आयडी बनवून या व्यापाऱ्याला पैसे पाठविण्यास सांगितले जाते. ज्या कंपनीबरोबर अनेक वर्षांपासून व्यवहार सुरू होता, त्याच कंपनीकडून मेल येतो. आमचे बँक खाते बदलले आहे. बदललेल्या खात्यावर रक्कम पाठवा, त्यानंतर 800 टन चुना पाठविण्यात येईल, असे सांगितले जाते. मेलवरून झालेल्या व्यवहारावर विश्वास ठेवून हा व्यापारी भामट्याने दिलेल्या बँक खात्यात 18 लाख रुपये जमा करतो. ज्या कंपनीकडून तो चुना मागवतो त्या कंपनीला ते पैसे मिळालेच नाहीत.
अशा अनेक घटना बेळगाव शहर व जिल्ह्यात सुरू आहेत. सायबर क्राईम विभागासमोर या गुन्हेगारांनी तपासाचे आव्हान उभे केले आहे. माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांच्या तीन बँक खात्यातून प्रत्येकी 1 लाख रुपये याप्रमाणे 3 लाख रुपये सायबर गुन्हेगारांनी काढले आहेत. बेळगाव येथील एका उद्योजकाच्या बँक खात्यातूनही 20 लाख रुपयांहून अधिक रक्कम काढण्यात आली आहे. एखाद्या फसवणुकीच्या घटनेनंतर फशी पडलेले लोक सायबर क्राईम विभागाकडे तक्रार करतात. ज्या बँक खात्यावर रक्कम ट्रान्स्फर करण्यात आली आहे, ते खाते सायबर क्राईम विभागाकडून गोठवले जाते. त्यानंतर त्या बँक खात्यावर असलेला पैसा तिथेच राहतो. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ही रक्कम संबंधितांना परत केली जाते. ही गोष्ट चांगलीच माहिती असल्यामुळे सायबर गुन्हेगारांनीही रोज नवनवीन शक्कल लढविण्यास सुरुवात केली आहे.
सायबर क्राईम विभागाकडून प्रत्येक प्रकरणाच्या तपासासाठी प्रयत्न केले जातात. मुख्य गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. कारण सायबर क्राईम विभागाला चकविण्यासाठी ऑनलाईन लुटीतील रक्कम गुन्हेगार क्रिप्टो करन्सीत गुंतवत आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. परदेशातील सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. सध्या जास्तीत जास्त फसवणूक स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाने सुरू आहे. यासाठी व्हॉट्सअप, फेसबुक, टेलिग्राम सारख्या सोशल मीडियांचा वापर केला जात आहे. सुरुवातीला मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे सांगून सावजाचा विश्वास संपादन केला जातो. नंतर एक मोठी रक्कम जमली की कंपनीच बंद करून दुसरी कंपनी सुरू करण्यात येते.
बेळगावसह कर्नाटकातील विविध शहरातील गुंतवणूकदारांना ठकविण्याचे काम सुरूच आहे. सायबर क्राईम विभागाकडे तक्रार करण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. झटपट परतावा देण्यासाठी कायद्यात तरतूदच नाही. याचे साधे गणित समजले की कोणाचीही फसवणूक होणार नाही. मात्र, सायबर गुन्हेगारांकडून टाकल्या जाणाऱ्या गळाला सावज झटपट श्रीमंतीच्या मोहापायी सहजपणे लागत आहेत. सोशल मीडियावर सायबर गुन्हेगारांकडून केल्या जाणाऱ्या प्रचाराला थारा दिला तरच सावजाची फसवणूक होते, हे निश्चित आहे. गुन्हेगार पोलिसांना चकविण्यासाठी रोज नवनवीन क्लृप्त्या लढवत आहेत.
एपीके फाईलवर क्लिक करू नका
आता एपीके फाईलच्या माध्यमातून मोबाईल हॅक करून त्यांच्या बँक खात्यातील रक्कम हडप करण्याचे प्रकार वाढले आहेत. व्हॉट्सअपवर येणारे संदेश आपोआप डाऊनलोड होण्यासाठी ऑटो डाऊनलोड सेटिंग ठेवले असेल तर तुमची फसवणूक होणार, हे नक्कीच. कारण गुन्हेगारांकडून येणाऱ्या एपीके फाईलवर क्लिक केले की त्यांचा मोबाईल हॅक होतो. त्यावर क्लिक करू नका, तुमच्याशी संबंधित नसलेल्या व्यक्तींकडून येणाऱ्या मेसेजकडे दुर्लक्ष करा, असे वारंवार सायबर क्राईम विभागाकडून सांगूनही फसणाऱ्या लोकांची संख्या काही कमी होत नाही. ऑटो डाऊनलोडचे सेटिंग बदलले नाही तर फसवणुकीची शक्यता अधिक असते. त्यामुळे प्रत्येक मोबाईल ग्राहकाने आपला मोबाईलचा ताबा गुन्हेगारांकडे जाऊ नये, याची काळजी घेण्याची गरज आहे.
शेअर मार्केटच्या नावेच सावजांना टार्गेट
खास करून शेअर मार्केटच्या नावेच सावजांना टार्गेट केले जात आहे. अनेक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहजपणे मेसेज पाठवून सावजांना गळ टाकण्याचे कसब सायबर गुन्हेगारांना अवगत आहे. आपल्या गल्लीतील, गावातील, शहरातील मित्रपरिवारांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये झटपट नफ्याचा मेसेज कसा येतो? याचा साधा विचारही कोणी करीत नाही. त्यामुळेच सहजपणे लोक फशी पडतात.









