महाराष्ट्राचे माजी मंत्री जयंत पाटील यांचे गौरवोद्गार : बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रीयल सोसायटीचा सुवर्णमहोत्सव उत्साहात

बेळगाव : बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रीयल को-ऑप. क्रेडिट सोसायटीने लावलेल्या रोपाचा आज वटवृक्ष झाला आहे. सहकार क्षेत्रात प्रामाणिकपणामुळेच ही संस्था टिकून आहे. संस्थेचे वाढलेले भांडवल आणि सभासद हाच विश्वास आहे. विशेषत: स्वत:च्या कर्तबगारीमुळे संस्थेने भरारी घेत लहान-मोठ्या व्यावसायिकांना पाठबळ दिले आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी काढले. बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रीयल को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा सुवर्णमहोत्सव सोहळा रविवारी रेल्वे ओव्हरब्रीज येथील मराठा मंदिरमध्ये पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन रमेश मोदगेकर होते. व्यासपीठावर निवृत्त पणन संचालक दिनेश ओऊळकर, प्रा. डॉ. दत्ता पाटील, प्रा. आनंद मेणसे, व्हाईस चेअरमन रघुनाथ पाटील उपस्थित होते. जयंत पाटील पुढे म्हणाले, केवळ धनिकांना जवळ न करता तळागाळातील माणसाला संस्थेने पाठबळ दिले आहे. या संस्थेचा पाया पक्का असल्यामुळे ही संस्था सहकार चळवळीत टिकून आहे. सहकार क्षेत्रात सगळ्यांनी एकत्र येऊन भांडवल जमा करणे ही भूमिका वाढत गेली. याला गुजरात आणि महाराष्ट्रात यश आले. त्यामुळेच महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सहकार चळवळ टिकून असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘सुवर्णाध्याय’ स्मरणिकेचे प्रकाशन
प्रारंभी सृष्टी देसाई हिने स्वागतगीत सादर केले. रघुनाथ पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते ‘सुवर्णाध्याय’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. य् ाावेळी बोलताना गडहिंग्लज येथील प्रा. डॉ. दत्ता पाटील म्हणाले, केवळ नफा मिळविणे हा उद्देश न ठेवता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सहकार्य करण्यासाठी बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रीयल सोसायटीने मोठे कार्य केले आहे. लहान-मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक पाठबळ दिले आहे. एका ध्येयाने प्रेरित होऊन स्थापन केलेल्या संस्थेचा आज वटवृक्ष झाला आहे.
लोकोपयोगी कारभारासाठी प्रयत्न आवश्यक
गरजवंतांची गरज लक्षात घेऊन संस्थेने आर्थिक पुरवठा केला आहे. सभासदांचा विश्वास हीच संस्थेची ठेव आहे. ती तालुका रुरल सोसायटीने जपली आहे. सर्वसामान्यांच्या हाताला काम मिळावे, या दृष्टीने अनेकांना पाठबळ दिले आहे. आज सहकारी संस्थांचा कारभार कसा लोकोपयोगी होईल, या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. य् ाावेळी निवृत्त पणन संचालक दिनेश ओऊळकर यांनी सहकार क्षेत्रातील आव्हाने आणि इतर बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा सत्कार माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. शिवाय जुने सभासद, संचालक आणि कर्मचाऱ्यांचादेखील गौरव करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सभासद, हितचिंतक, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सी. वाय. पाटील यांनी केले.आभार के. सी. मोदगेकर यांनी मानले.
सीमालढ्यासाठी महाराष्ट्र प्रयत्नशील
सीमालढ्याच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी महाराष्ट्र प्रयत्नशील आहे. हा सारा परिसर महाराष्ट्रात सामील झाला पाहिजे आणि येथील जनतेवरील अन्याय दूर झाला पाहिजे, यासाठी महाराष्ट्र शासन आग्रही आहे. येथील तरुणांना कित्येक यातना सोसाव्या लागत असल्या तरी संघर्ष अनेक पिढ्यांपासून टिकून आहे. आमदार कोणताही असला तरी येथील लोकभावना महत्त्वाची आहे, असेही माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले.









