आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांचे उपरोधिक वक्तव्य : भूपेश बघेल लवकरच तुरुंगात जाणार
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी महादेव बेटिंग अॅप प्रकरणारून भाजप आणि काँग्रेस यांच्यातील वाक्युद्ध तीव्र झाले आहे. एकीकडे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे भाजप आमच्याशी (काँग्रेस) लढू शकत नसल्यानेच त्याने ईडीला पुढे केल्याचे म्हणत आहेत. तर दुसरीकडे भाजपने ईडीची कारवाई सध्या पूर्णपणे सुरू झाली नसल्याचे म्हटले आहे.
ईडीकडून बघेल यांना मिळाला वेळ
आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हेमंत विश्व शर्मा यांनी छत्तीसगडमध्ये सातत्याने प्रचारसभा घेतला आहेत. जाहीरसभांमध्ये शर्मा हे महादेव बेटिंग अॅपचा उल्लेख करत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर निशाणा साधत आहेत. भूपेश बघेल यांना आपण तुरुंगात जाणार आहोत याची कल्पना आहे. याचमुळे ते स्वत:सोबत आणखी 10 जणांना तुरुंगात नेऊ पाहत आहेत. बघेल यांच्याकडे अद्याप ईडी पोहोचलेली नाही. हा तर ईडीचा मोठेपणा आहे, म्हणूनच बघेल यांना निवडणूक होईपर्यंत डिस्टर्ब केले जात नसावे. ईडीने एकप्रकारे बघेल यांना निवडणूक लढविण्यासाठी वेळ दिला आहे. निवडणुकीनंतर ईडी बघेल यांच्या दारात पोहोचेल, असा दावा भाजप नेत्याने केला आहे. याप्रकरणी सर्वात अधिक आनंद तर टी.एस. सिंहदेव यांना झाला आहे, असे शर्मा यांनी म्हटले आहे. सिंहदेव हे छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री असून बघेल आणि त्यांच्यात राजकीय संघर्ष सुरू असल्याचे मानले जाते.
अन्य कुणाला इतकी सवलत नाही
ईडीने भारतात अन्य कुठल्याही राजकीय नेत्याला अशाप्रकारची सवलत दिल्याचे मला दिसून आलेले नाही. न्यायालयासमोर भूपेश बघेल यांनी 508 कोटी रुपये स्वीकारल्याचे मान्य केले, तरीही अद्याप त्यांना ईडीकडून नोटीस जारी करण्यात आलेली नाही. बघेल यांनी याकरता ईडीचे आभार मानावेत. ईडी अन्य कुठल्याही नेत्याला अशाप्रकारची सुविधा देत नाही. ईडी आणि बघेल यांच्यात चांगले संबंध राहिले असावेत. अन्यथा बघेल यांना आतापर्यंत नोटीस बजावण्यात आली असती, असे उद्गार शर्मा यांनी काढले आहेत.
बघेल यांचे प्रत्युत्तर
तर हेमंत विश्व शर्मा यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री बघेल यांनीही कठोर टिप्पणी केली आहे. शारदा चिटफंड घोटाळ्यात शर्मा यांना क्लीनचिट मिळाली का? कारवाई न करण्यात आल्याने आणि मुख्यमंत्री होता आल्याने शर्मा यांनी ईडीचे आभार मानावेत, अशी उपहासात्मक टिप्पणी बघेल यांनी केली आहे. महादेव बेटिंग
अॅप प्रकरण हा भाजपचा सुनियोजित कट आहे. याप्रकरणाची कहाणी निवडणुकीनंतर संपुष्टात येणार आहे. या घोटाळ्याच्या मुख्य आरोपीचा संबंध भाजपशी आहे. या प्रकरणी ज्या लोकांना अटक करण्यात आली आहे. ते भाजपशी संबंधित असल्याचा दावा बघेल यांनी केला आहे.









