राहुल यांच्या वक्तव्याचा उपराष्ट्रपतानी घेतला समाचार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मंगळवारी स्वत:च्या निवासस्थानी इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांना संबोधित केले. आम्ही रियर ह्यू मिररमध्ये पाहणे आवश्यक आहे, यात पाहून देशाच्या संस्थांना कलंकित अन् नष्ट करू पाहत असलेल्या लोकांवर लक्ष ठेवावे असे म्हणत धनखड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे.
राहुल गांधींनी रविवारी अमेरिकेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाची गाडी रियर ह्यू मिरर पाहून चालवित असल्याची टीका केली होती. मागील दिशेला पाहून वाहन चालविताना ते वारंवार दुर्घटना घडत असल्याने हैराण होत असल्याची उपरोधिक टिप्पणी राहुल यांनी केली होती. राहुल यांच्या याच टीकेचा समाचार उपराष्ट्रपतींनी घेतला आहे.
काही लोकांना देशाबद्दल गर्व नाही
रियर ह्यू मिररमध्ये पाहिल्यावर कुठल्या लोकांचे देशाबद्दलचे वर्तन योग्य नाही हे दिसून येणार आहे. दुर्घटनेस कारणीभूत ठरणाऱ्या लोकांपासून वाचण्यासाठी आपण सर्वजण रियर ह्यू मिररमध्ये पाहत असतो. काही लोकांचा देशाची क्षमता आणि कामगिरींब्दल गोंधळ होत असतो. अशा लोकांना देशाबद्दल गर्व वाटत नाही. देश आणि विदेशात बसलेले लोक आम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु आम्ही त्यांना हे करू देणार नसल्याचे धनखड यांनी अधिकाऱ्यांना संबोधित करताना म्हटले आहे.
2047 पर्यंत पहिल्या क्रमांकाचा देश
भारत 2047 पर्यंत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरणार आहे. अधिकाऱ्यांनी इतिहासाचे ओझे उचलू नये, अन्यथा ते तुमच्या विकासात अडथळा ठरेल असे धनखड यांनी अधिकाऱ्यांना उद्देशून म्हटले आहे. काही लोकांना भारताचे यश पचत नाही, कारण आमचा देश शांतता आणि स्थैर्यावर विश्वास ठेवतो. भारतीय नवे कौशल्य शिकण्यास सर्वात आघाडीवर असतात. हे यश आम्हाला स्वयंशिक्षण आणि स्वकौशल्यामुळे मिळाले आहे. आम्हाला आमच्या यशाबद्दल गर्व करायला हवा असे धनखड यांनी अधिकाऱ्यांना संबोधित करताना म्हटले आहे.