कुडाळ S R M कॉलेजात ‘आर्थिक साक्षरता’ या विषयावर व्याख्यान
वार्ताहर / कुडाळ
आर्थिक व्यवहार करताना पैशाची किंमत ओळखता आली पाहिजे. आपल्याकडील पैसा हा फसवणूकीला बळी पडत असतो. कोणत्याही बँकेमध्ये गुंतवणूक करताना सुरक्षितता बाळगणे फार महत्वाचे असते. आजकाल डिजिटलच्या माध्यमातून लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. या फसवणूकीला सुशिक्षित लोक बळी पडत आहेत. माणसाचा स्वभाव, भावना या गोष्टी फसवणूकीला बळी पडत असतात. आपण कोणावर विश्वास ठेवतो हे आपल्याला ओळखता आले पाहिजे.आपली फसवणूक होऊ नये, यासाठी आपण नेहमी सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहन गुंतवणूक मार्गदर्शक डी. बी. देसाई यांनी शुक्रवारी कुडाळ येथे केले.
येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आर्थिक साक्षरता’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी डॉ. शरयु आसोलकर, प्रा. भारत तुपेरे, डॉ. ए. एन. लोखंडे, प्रा. प्रमोद जमदाडे, प्रा. अजित कानशिडे, योगिता वाईरकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, अर्थसंस्थांशी व्यवहार करताना कोणती बँक किंवा संस्था सरकारी नियंत्रणाखाली येतात, कोणत्या खासगी संस्था आहेत, हे आपल्याला ओळखता आले पाहिजे. पैसे ठेवण्यासाठी एखादी गोष्ट सुरक्षित आहे की नाही हे ओळखणे महत्वाचे आहे. पैसा हा योग्य प्रकारे खर्च करणे आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीचे मोजमाप महत्वाचे असते. आपल्याकडील पैसे योग्य प्रकारे गुंतवले, तर त्याचा योग्य उपयोग होतो. आपल्याकडे साधने खूप आहेत. परंतु ती वापरायची कशी आपल्याला कळत नाही. त्यासाठी आर्थिक नियोजन महत्वाचे असते. फायनान्शिअल प्लॅनिंग करण्यासाठी पैसा हा महत्वाचा असतो. प्रत्येक इंनव्हेसमेंट ही गरज ओळखून केली पाहिजे. आपल्या सगळ्या गोष्टी या उद्दिष्टाशी महत्त्वाच्या आहेत. तुमच्या उत्पन्नाच्या पंचवीस ते तीस टक्के भाग तुम्ही सेविंग केला पाहिजे. असे त्यांनी सांगितले.
श्री. लोखंडे म्हणाले, आज जे लोक आर्थिक दृष्ट्या निरक्षर आहेत. त्यांना आपल्याला साक्षर बनवायचे आहे. साक्षरता जशी महत्वाची असते. त्याप्रमाणे आर्थिक साक्षरता सुद्धा महत्वाची आहे. जो आपल्याला इन्कम मिळतो, त्याचा योग्य वापर करणे महत्वाचे आहे. आजकाल बरीच मुले बचत खात्यात पैसे गुंतवत असतात. परंतु त्या पैशांना व्याज काही मिळत नाही. आतापासूनच मुलांना बँकेतील काही योजना असतात त्या योजनांची माहिती होणे, आवश्यक आहे. अशी व्याख्याने प्रत्येक शाळांमध्ये होणे महत्वाचे आहे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ए. एन. लोखंडे यांनी केले. सूत्रसंचलन डॉ. भारत तुपेरे यांनी केले. तर आभार अजित कानशिडे यांनी मानले.









