आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूरचा उपक्रम : राजर्षी शाहू महाराजांच्या इरिगेशन, उद्योग क्षेत्रातील कार्याला अभिवादन : कोल्हापुरातील आयटी कंपन्यांची, नवतंत्रज्ञानाची माहिती एका छताखाली मिळणार
प्रतिनिधी/कोल्हापूर
राजर्षी शाहू स्मृती शताब्दी निमित्त सुरू असलेल्या कृतज्ञता पर्वात आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर या संस्थेतर्फे आयटी एक्सपो 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. शाहू मिलमध्ये 17 व 18 मे या दोन दिवशी सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत आयटी एक्सपोच्या माध्यमातून नवतंत्रज्ञानाची माहिती करवीरवासीयांना मिळणार आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी विविध क्षेत्रांसह इरिगेशन व उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देत प्रचंड मोलाचे कार्य केले. त्यातून कोल्हापूरचा विकास झाला. शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाहू मिलमध्ये आयटी एक्सपो – 2022 चे आयोजन केले आहे. यामध्ये कोल्हापुरातील आयटी क्षेत्रातील व हार्डवेअर क्षेत्रातील शंभराहून जास्त कंपन्या भाग घेऊन आपला स्टॉल प्रदर्शित करणार आहेत. कोल्हापुरात कार्यरत असलेल्या आयटी कंपन्यांची आणि नाविन्यपूर्ण संशोधनसुरू करण्यासाठी इनक्युबेटर संस्थांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. तरी कोल्हापुरातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, अशी आवाहन आयटीएकेचे अध्यक्ष कैलास मेढे, सेक्रेटरी रणजित नार्वेकर, संचालक प्रसन्न कुलकर्णी यांच्यासह सर्व संचालक मंडळाने केले आहे.