अमेरिकेतील नोकरी सोडून मडगावात सुरु केला व्यवसाय : दिवसाला 700 ते 800 किलो खोवलेले खोबऱयाची करतो विक्री
प्रतिनिधी / पणजी
पेशाने आयटी अभियंता अमेरिकेत स्थायिक झालेला परंतु अचानक निर्णय घेऊन पुन्हा गोव्यात स्थायिक झालेल्या मडगावातील एका युवा व्यावसायिकाने चक्क नारळाचा किस पाडून देण्याचा व्यवसाय सुरु केला आणि आज त्याने 22 जणांना रोजगारही प्राप्त करुन दिला. गणेशचतुर्थी उत्सवाच्या निमित्ताने त्याकडील खोबऱयाला एवढी वाढती मागणी की त्याला बोलायलाही फुर्सद मिळत नाही.
ही यशोगाथा आहे नावेलीचे उद्योजक विघ्नेश प्रभुदेसाई यांची. ते आज आपल्याच व्यवसायातून खूष आहे. मी उत्पन्न मिळवितो त्याचबरोबर आणखी 22 जणांना रोजगार मिळवून दिला यातही मला जास्त समाधान आहे, असे विघ्नेश म्हणाले. मडगावच्या रेल्वे ओव्हरब्रीजच्या पलिकडे नावेलीच्या रस्त्यावर विघ्नेश प्रभुदेसाई यांचे छोटेखानी घर आहे व या घरातच त्यांनी आपला व्यवसाय सुरु केला. फातोडर्य़ाचे आमदार विजय सरदेसाई यांनी त्यांच्या या धाडसी निर्णयाचे कौतुक केले.
आईला होणारा त्रास पाहिला, अन् सूचली युक्ती
याबाबत विघ्नेश यांना हा व्यवसाय का सूचला? असा सवाल केला असता एक दिवस आपली आई विळीवर नारळ खोवून खोबरे करीत असताना मध्येच थांबली. काय झाले असे विचारले असता खोबरे खोवून दमायला झाल्याचे ती म्हणाली. त्याचवेळी एक विचार मनात चमकून गेला. माझ्या आईला जर हा त्रास, तर मग इतर महिलांना केवढा त्रास? आपण नागरिकांना खोबरे खोवून दिले तर? अमेरिकेत आयटी अभियंता म्हणून असलेली चांगली नोकरी सोडून गोव्यात आले व त्यांनी नारळ खोवून त्याचे खोबरे काढून प्लास्टिक पिशवीत पॅक करुन विकण्याचे ठरविले. या प्रकारात काम जास्त, परिश्रम जास्त व नफा कमी याची कल्पना असून देखील विघ्नेशनी केवळ आव्हान म्हणून हा व्यवसाय करण्याचे ठरविले.
केरळमधील संस्थेत घेतले प्रशिक्षण
विघ्नेश प्रभुदेसाई यांनी केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेशमध्ये जाऊन खोबऱयाच्या विषयी अभ्यास केला. केरळातील एका प्रसिद्ध संस्थेत जाऊन नारळाचे काय करायचे? याचे प्रशिक्षण घेतले व गोव्यात येऊन एका शेडमध्ये मडगावात त्यांनी नारळ खोवण्यास प्रारंभ केला.
दिवसाला 700 ते 800 किलो खोबऱयाची विक्री
सुरुवातीला 2 ते 3 जणांना घेऊन हे काम सुरु केले. गेली 4 वर्षे ते हा व्यवसाय करतात. गोव्यातील असंख्य हॉटेल चालकांना ते आज ताजे सकस खोबरे पुरवितात. हॉटेलवाल्यांनाही फायदा होतो. 1 किलो, 5 किलोच्या बॅगा तयार करुन ते हॉटेल्सना पुरवितात. दिवसा 700 ते 800 किलो खोवलेले ताजे खोबरे ते संपूर्ण गोव्यात वितरित करतात. खोबरे खोवण्यासाठी नारळ आणा, ते साफ करा, फोडा, खोवा नंतर करवंटय़ाचे काय करायचे? हा देखील प्रश्न येतो. आता विघ्नेशनी रेडिमेड खोबरे दिल्याने हॉटेल चालकांना वेगळी माणसे या कामासाठी ठेवण्याची गरज नाही.
नारळ पाणी विक्री केंद्र सुरु करण्याचा इरादा
आपल्याकडे दिवसाकाठी 2000 नारळ फोडले जातात. यातून निघणारे पाणी हे टॉनिक वॉटर असते. ते रु. 90 प्रतिलिटर पर्यंत विकले जाऊ शकते. आम्ही मग ते रु. 30 ते रु. 60 प्रतिलिटर या पद्धतीने विकतो. कैकवेळा हे पाणी विक्रीअभावी टाकून द्यावे लागते. मडगावात लवकरच आम्ही नारळाचे पाणी विक्री केंद्र सुरु करणार आहोत, असे विघ्नेश म्हणाले.
नारळाचा संपूर्ण उपयोग
खोवलेले खोबरे त्वरित पॅक करुन ते डिपफ्रिजमध्ये ठेवले तरच टिकते. अन्यथा खराब होऊन जाते व डिपफ्रिजमध्ये 1 वर्ष जरी ठेवले तरी काहीही होत नाही. तरीदेखील खोबऱयाचा त्वरित वापर करा असा आमचा संदेश असतो, असे विघ्नेश म्हणाले. नारळाच्या करवंटय़ापासून आम्ही कोणाला तरी कोळसा तयार करण्यास सांगतो. कैकवेळा बहुतांश करवंटय़ा या मोफतपणे मडगावच्या हिंदू स्मशानभूमिला पाठवून देतो व नारळावरील काथ्याची वेंगुर्ला येथे निर्यात करतो व तिथून येताना काथ्यातून बाहेर पडणारा भुसा अर्थात कोको पीठ आणतो व अनेकांना शेती बागातीसाठी देऊन टाकतो.
विजय सरदेसाई यांच्याकडून कौतुक
आता लवकरच आम्ही या व्यवसायात अत्याधुनिक यंत्रणा आणणार आहोत व आणखी काही जणांना रोजगार मिळवून देण्याचा इरादा विघ्नेश प्रभुदेसाई यांनी व्यक्त केला. त्यांचे कौतुक करण्यासाठी आमदार विजय सरदेसाई हे त्यांच्या घरी पोहोचले. एक अभियंता काय करु शकतो हे पहा! व या व्यवसायातून 100 टक्के नारळ गोव्याचेच वापरलेले आहेत, विजय सरदेसाई म्हणाले.









