सेन्सेक्स 388 तर निफ्टी 97 अंकांनी नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले आहेत. यामध्ये आयटी आणि आर्थिक क्षेत्रात झालेल्या नफा वसुलीमुळे दोन्ही निर्देशांक नुकसानीत राहिले आहेत. बीएसई सेन्सेक्स सुमारे 150 अंकांनी घसरून 82,946.04 वर उघडला. मात्र अखेरच्या क्षणी सेन्सेक्स 387.73 अंकांनी घसरुन निर्देशांक 82,626.23 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारचा निफ्टी अखेर 96.55 अंकांनी प्रभावीत होत 25,327.05 वर बंद झाला.
सेबी-नोंदणीकृत ऑनलाइन ट्रेडिंग आणि वेल्थ टेक फर्म एनरिच मनीचे सीईओ पोनमुडी आर म्हणाले, ‘कोणत्याही सकारात्मक ट्रिगर नसतानाही अल्पकालीन व्यापाऱ्यांनी नफा घेतल्याने बाजार किंचित घसरलेला दिसला. हे गुंतवणूकदारांच्या भावनेतील सावधगिरीचे प्रतिबिंब आहे. डीफॉल्ट दरांमध्ये वाढ झाल्यामुळे, विशेषत: एनबीएफसी क्षेत्रातील मायक्रोफायनान्स आणि ऑटो कर्जांमध्ये, वित्तीय शेअर्समध्ये विक्री झाली.’ सेन्सेक्स कंपन्यांमध्ये एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, ट्रेंट, टायटन, महिंद्रा अँड महिंद्रा यांचे शेअर्स 1.52 टक्क्यांनी घसरले. दुसरीकडे, अदानी पोर्ट्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, भारती एअरटेल, एनटीपीसी आणि एशियन पेंट्स यांचे शेअर्स 1.13 टक्क्यांपर्यंत वाढले.
निफ्टी मेटल, निफ्टी फार्मा आणि निफ्टी रिअॅलिटी निर्देशांकातही वाढ झाली. दुसरीकडे, एफएमसीजी, आयटी, ऑटो आणि प्रायव्हेट बँक निर्देशांक 0.65 टक्क्यांपर्यंत घसरून बंद झाले.
जागतिक बाजारपेठ
शुक्रवारच्या व्यवहारादरम्यान आशियाई बाजारपेठांमध्ये बहुतांश तेजी होती. हे गुरुवारी वॉल स्ट्रीटवरील तेजीचे प्रतिबिंब आहे. निक्केई निर्देशांक 0.8 टक्क्यांनी वाढून सलग दुसऱ्या सत्रात विक्रमी उच्चांक गाठला. गुंतवणूकदार बँक ऑफ जपानच्या धोरण बैठकीच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. मध्यवर्ती बँकेची दोन दिवसांची बैठक आज संपेल. रॉयटर्सने सर्वेक्षण केलेल्या अर्थतज्ञांचा असा विश्वास आहे की व्याजदर 0.5 टक्क्यांवर स्थिर राहतील.









