पंतप्रधान, मुख्यमंत्री काय म्हणतात ते महत्त्वाचे : उत्पल पर्रीकर यांचा मोन्सेरातांवर पलटवार
पणजी : पणजीचे आमदार व महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी माजी संरक्षणमंत्री, माजी मुख्यमंत्री, पद्मभूषण स्व. मनोहर पर्रीकर यांच्या विरोधात केलेल्या शेरेबाजीवर जनमानसात तीव्र पडसाद उमटत आहे. त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी मोन्सेरात यांच्यावर पलटवार केला आहे. मनोहर पर्रीकरांविषयी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत काय विचार करतात ते महत्त्वाचे आहे. मोन्सेरात काय बरळतात त्याला महत्त्व नाही, अशा शब्दांत उत्पल पर्रीकर यांनी मोन्सेरात यांच्यावर निशाणा साधला आहे. आपण पणजीतील स्मार्ट सिटी कामांबाबत आवाज उठवल्यानंतर पणजीत उपाययोजना सुरू झाल्या, याचा आपल्याला आनंद आहे. आपले औषध कुणाला लागायचे ते बरोबर लागले आहे, असे उत्पल पर्रीकर म्हणाले.
मोन्सेरात यांना टीकेचे परिणाम कळतील
भाजपचे अध्यक्ष खासदार सदानंद तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार, मंत्र्यांनी चुप्पी साधली असली तरी भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी पर्रीकरांवरील विधाने निंदनीय, घृणास्पद व सत्याची कास सोडून असल्याची टीका मंत्री मोन्सेरात यांचे नाव न घेता केली आहे. मनोहर पर्रीकर देशपातळीवरील नेते होते. ते संरक्षणमंत्री होते आणि गोव्यासह देशासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. पर्रीकर अस्तित्वात नसताना अशा प्रकारची विधाने करणे अशोभनीय आहे. ती भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी, जनता यांना दुखावणारी आहेत. त्यांना ती सहन होणार नाही. त्याचे परिणाम निश्चितच दिसून येतील.
ते हयात असताना बोलायला हवे होते
पर्रीकरांच्या अविस्मरणीय योगदानामुळेच त्यांना पद्मभूषण हा मरणोत्तर किताब देण्यात आला. त्यांच्या कार्याचा सर्वांना मोठा अभिमान, आत्मियता आहे. पर्रीकर उत्तरे देण्यासाठी उपलब्ध नसताना असले नको ते आरोप करणे चुकीचे आहे. ते हयात असताना काय ते बोलायला हवे होते, असे वेर्णेकर म्हणाले.
भाजपचे कार्यकर्ते, आमदार, मंत्री गप्प
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोन्सेरात आणि पर्रीकर यांच्या जुगलबंदीत न पडण्याचे ठरविले असून त्याबाबत बोलण्यास नकार दर्शवला आहे. पणजी शहरातील स्मार्ट सिटीची सर्व कामे 30 मेपूर्वी पूर्ण करा, असे निर्देश सर्व संबंधितांना देण्यात आल्याचे डॉ. सावंत म्हणाले. भाजपचे इतर नेतेही या प्रकरणी बोलायला तयार नाहीत, असेही समोर आले आहे.
आपण विषय काढल्याने धावपळ
स्मार्ट सिटीचा विषय उकरून काढल्यामुळेच सर्वांची धावपळ उडाली आणि त्यांना रस्त्यावर उतरावे लागले. त्यांची मोठी जळजळ झाली, अशी टिप्पणी उत्पल पर्रीकर यांनी केली आहे. स्मार्ट सिटीची कार्यवाही केव्हापासून खराब झाली हे जनतेला माहीत आहे. पणजीत भाजपचा आमदार होता की नव्हता व त्याने पणजीचा, गोव्याचा विकास केला की नाही याचे उत्तर आता भाजपने द्यायचे आहे, असे पर्रीकर म्हणाले.
ना वारसा, ना विचारांशी बांधिलकी
स्व. मनोहर पर्रीकर यांनी राज्यभरात भाजपची बांधणी केली हे सत्य आहे. निवडणूक हा धंदा समजून पक्षांतर करायचे, निवडून यायचे. ज्याला वैचारिक वारसा नाही, विचारांची बांधिलकी नाही. भाजपमध्ये राहून स्व. पर्रीकर यांच्यावर तोंडसुख घेता येते काय? असा प्रश्न उत्पल पर्रीकर यांनी केला आहे. पर्रीकर यांनी पणजीत काय केले हे पणजीकरच सांगतील. त्यामुळे मान्सेरातांच्या आरोपावर हसावे की रडावे तेच समजत नाही. पणजीचे लोक पर्रीकरांना प्रश्न विचारायचे, चर्चा करायचे, अशी ती पणजीची संस्कृती होती व आहे. आता कुठे गेली ती ? अशी विचारणा उत्पल पर्रीकर यांनी केली.
मुख्यमंत्री, अध्यक्षासह सर्वांचेच मौन
मनोहर पर्रीकर यांच्यावरुन बाबूश मोन्सेरात विऊद्ध उत्पल पर्रीकर असा वाद सुरू असला तरी या वादापासून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दूरच राहणे पसंत केले आहे. काल गुरुवारी पणजीतील एका कार्यक्रमानंतर बाबूश विऊद्ध उत्पल वादाविषयी पत्रकारांनी मुख्यमंत्री सावंत यांना विचारले असता, त्यांनी यावर भाष्य करण्याचे टाळले. मनोहर पर्रीकर यांनी 25 वर्षे पणजीचे नेतृत्व करताना विकासाकडे दुर्लक्ष करून पणजीची वाताहत केली. स्मार्ट सिटीच्या कामासाठी मनोहर पर्रीकर यांनी आणलेल्या सल्लागारांनी कोट्यावधी ऊपये लाटले, असा घणाघाती आरोपही केला. गेल्या पंचवीस वर्षांत मनोहर पर्रीकर यांनी जेवढ्या पैशांची उधळपट्टी केली, त्यात दोन पूल उभारता आले असते. पर्रीकरांनी साध्यातील साधे पदपथ उभारण्यासाठीही सल्लागार नेमले आणि यासाठी त्यांनी लाखो ऊपयांचा चुराडा केला, अशी टीका मोन्सेरात यांनी केली आहे. मोन्सेरात यांनी मनोहर पर्रीकर यांच्याविऊद्ध कठोर शब्दांत टीका केल्याने भाजपातही खळबळ माजली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनीही बोलणे टाळल्याने बाबूश व उत्पल वादाची ठिणगी आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.









