आमदार असिफ सेठ यांच्या प्रयत्नांना यश : रोड अंडरब्रिजचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे
बेळगाव : न्यू गांधीनगर येथील रेल्वेगेटवरील उड्डाणपूलबाबतचा प्रश्न अखेर मार्गी लागला. न्यू गांधीनगर व अमननगर येथील नागरिकांच्या चर्चेतून रोड अंडरब्रिज (भूयारी मार्ग) करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे उड्डाणपुलाबाबतचा तिढा सुटला असून, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनाही हा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ यांनी दिली. उड्डाणपुलाबाबत न्यू गांधीनगर येथील नागरिकांनी विरोध दर्शविला होता. तर अमननगर येथील नागरिकांनी समर्थन केले होते. आठ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत परस्पर विरोधी प्रस्ताव दोन्ही नगरांतील नागरिकांनी दिले होते. रेल्वे उड्डाणपूल केल्यास न्यू गांधीनगर येथील नागरिकांना फटका बसेल, तसेच येथील व्यापार ठप्प होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती.
तर अमननगर येथील नागरिकांनी उड्डाणपूल झाल्यास अमननगरच्या नागरिकांची सोय होईल, असे म्हणणे होते. याबाबत आमदार असिफ सेठ यांनी सखोल अभ्यास करून रोड अंडरब्रिजचा पर्याय स्वीकारला आहे. दोन दिवसांपूर्वी बेंगळूर येथे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन त्यांना याबाबतची माहिती दिली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांशीही संपर्क साधण्यात आला. या रेल्वेगेटमधून अवजड वाहनांची वाहतूक नसल्याने 20 फूट रुंद अंडरब्रिज करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या व्यवसायाचेही नूकसान होणार नसल्याचे आमदार सेठ यांचे म्हणणे आहे. लवकरच हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत रेल्वेमंत्रालयाकडे पाठविला जाणार आहे.
अमननगर येथील नागरिकांचा जल्लोष
उड्डाणपुलाबाबतचा तिढा सुटल्यामुळे रविवारी रात्री अमननगर परिसरात नागरिकांनी जल्लोष केला. सुरुवातीपासूनच अमननगर येथील नागरिकांनी उड्डाणपूल व्हावा अशी मागणी केली होती. आता रोड अंडरब्रिज होण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याने अमननगर येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.









