मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे निवेदन
बेळगाव : रस्ता सुरक्षेच्यादृष्टीने वाहन परवाना देताना संबंधित चालकाला वाहन चालविण्यासंदर्भात आवश्यक सर्व माहिती असणे गरजेचे आहे. परंतु, सध्या बदललेल्या नियमावलीमुळे कोणालाही कोणतीही माहिती नसताना वाहन परवाना काढून दिला जात आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले असल्याने राज्य सरकारने वाहन परवाना देताना मोटार ड्रायव्हिंग स्कूलमधून प्रशिक्षण घेतल्यानंतरच परवाना उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी शुक्रवारी सुवर्ण विधानसौधसमोर फेडरेशन ऑफ कर्नाटक मोटर ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल ओनर्स असोसिएशनतर्फे आंदोलन करण्यात आले. हुबळी येथील सिद्धारुढ मठापासून बाईक रॅलीद्वारे सर्व मोटार ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलचे सदस्य सुवर्ण विधानसौध येथे पोहोचले. अलारवाड ब्रिजपासून पायी मोर्चा काढत आंदोलनस्थळापर्यंत घोषणा देत आंदोलक सहभागी झाले. ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घेतलेल्या नागरिकांनाच वाहन परवाना द्यावा. तसेच वाहन परवान्यासाठी फॉर्म क्र. 14 आवश्यक करावा. महाराष्ट्र आणि तेलंगणा या शेजारील राज्यांच्या धर्तीवर वाहनांच्या श्रेणीवर आधारित वाहन परवाना जारी करावा.
महिन्यातून एकदा बैठक घ्या
परिवहन आयुक्तांनी राज्यातील मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची किमान महिन्यातून एकदा तरी बैठक घेऊन वाहन परवान्यातील त्रुटी कमी कराव्यात. राज्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलवर कारवाई करावी. यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. कोंडुसकोप येथील आंदोलनस्थळावर बेळगाव, धारवाड, विजापूर, कारवार या परिसरातील मोटार ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलचे पदाधिकारी सहभागी झाले होते. बेळगाव विभागाचे अध्यक्ष बसवराज कडली यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.









