पहिल्या दिवशी एअर पिस्तूल व स्कीटचे प्रकार, सौरभ चौधरीच्या कामगिरीवर लक्ष
वृत्तसंस्था/ ब्युनॉस आयर्स
आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजीला आज गुरुवारपासून येथे सुरुवात होत असून पुनरागमन करणाऱ्या सौरभ चौधरीवर सर्वांचे लक्ष असेल. पुरुषांच्या 10 मी. पिस्तूल व स्कीट नेमबाजीने या मोहिमेची सुरुवात होईल.
पहिल्या दिवशी पुरुषांचा पिस्तूल नेमबाजी आणि महिला व पुरुष स्कीट नेमबाजीचे प्रकार सर्वप्रथम घेतले जातील. याशिवाय पहिल्या दिवशी 15 पैकी एक अंतिम लढत होईल. पुरुषांच्या 10 मी. पिस्तूल प्रकारात भारताचे तीन नेमबाज सौरभ चौधरी, रवींदर सिंग, वरुण तोमर भारताला सुवर्णमय सुरुवात करून देण्याचा प्रयत्न करतील. पुरुष व महिलांच्या स्कीट नेमबाजीत 25 टार्गेटच्या दोन पात्रता फेरी होतील. विद्यमान व माजी ऑलिम्पिक व वर्ल्ड चॅम्पियन्सह 45 देशांतील सुमारे 400 हून अधिक नेमबाज एकूण 15 सुवर्णपदकासाठी लढत देतील. या नेमबाजांत 23 नेमबाज असे आहेत, जे वैयक्तिक त्रयस्थ अॅथलीट (एआयएन) म्हणून सहभागी झाले आहेत.
ऑलिम्पिक व वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर वर्ल्ड कप नेमबाजी सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेसाठी राष्ट्रीय रायफल संघटनेने 35 सदस्यीय पथकाची निवड केली असून ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य मिळविणारी मनू भाकर दोन वैयक्तिक व एक मिश्र सांघिक प्रकारात भाग घेणार आहे. गुरुवारी पहिल्या दिवशी भारताचे 35 पैकी 9 नेमबाज शूटिंग रेंजवर खेळताना दिसतील.
पुरुषांच्या एअर पिस्तूल प्रकारात 40 बलाढ्या नेमबाज उतरणार असून त्यात 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदके मिळविलेले तीनही नेमबाज खेळताना दिसणार आहेत. याशिवाय जर्मनी, ब्राझील, कझाकस्तानचे माजी ऑलिम्पिक चॅम्पियनही त्यात सहभागी आहेत.
स्कीट नेमबाजी प्रकारात भाग घेणारे भारतीय खेळाडू तरुण व प्रतिभावान असून ते पूर्ण बहरात आहे. त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. महिला संघात रायझा धिल्लाँ, राष्ट्रीय विक्रमधारक गनेमत सेखाँ, दर्शना राठोड यांचा समावेश असून या स्तरावर त्यांनी वैयक्तिक पदके जिंकली आहेत. पुरुषांमध्ये अनंतजीत सिंग नरुका भारताचा प्रमुख आव्हानवीर असेल, भवतेघ सिंग गिल हा त्याच्यासमवेत असेल. गिलची वरिष्ठ स्तरावरील ही पहिलीच स्पर्धा आहे.
पुरुषांच्या स्कीटमध्ये ऑलिम्पिक चॅम्पियन गॅब्रिएली रॉसेटी हा फेव्हरिट मानला जातो तर महिला विभागात अमेरिकेची किम्बर्ली ऱ्होड हिला फेव्हरिट मानले जात आहे. चिलीची ऑलिम्पिक चॅम्पियन फ्रान्सिस्को क्रोव्हेटो चॅडिदचे आव्हानही महिला विभागात असेल.









