आदित्य-एल1 सूर्याच्या दिशेने झेपावणार
वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर इस्रो आता सूर्याचा अभ्यास करण्यासाठी एक आठवड्याच्या आत, शक्मयतो 2 सप्टेंबर रोजी सौर मोहीम सुरू करण्याच्या तयारीत आहे. इस्रो आदित्य-एल1 अंतराळयान पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या एल-1 (सूर्य-पृथ्वी लॅग्रॅन्जियन पॉईंट) बिंदूवर पाठवणार आहे. या ठिकाणावरून सूर्याच्या आसपासच्या परिसराची दूरस्थ निरीक्षणे नोंदवण्यात येणार आहेत.
सूर्याचे निरीक्षण करणारी ही पहिली समर्पित भारतीय अंतराळ मोहीम आहे. ‘आदित्य-एल1 हा राष्ट्रीय संस्थांच्या सहभागाने पूर्णत: स्वदेशी प्रयत्न असल्याचे इस्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. एल-1 भोवतीच्या कक्षेतून सूर्याचा अभ्यास करण्याचे उद्दिष्ट असलेल्या आदित्य-एल1 मिशनमध्ये फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या सर्वात बाहेरील थरांचे निरीक्षण करण्यासाठी सात पेलोड असतील. इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स, पुणे यांनी या मोहिमेसाठी सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजर पेलोड विकसित केले आहे. बेंगळूर येथील यूआर राव उपग्रह केंद्रात तयार करण्यात आलेला हा उपग्रह दोन आठवड्यांपूर्वी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या स्पेसपोर्टवर दाखल झाला आहे.
सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या एल-1 बिंदूभोवती हेलो ऑर्बिटमध्ये अंतराळयान ठेवण्याची योजना असल्याचे इस्रोने सांगितले. या बिंदूवरून सूर्याची निरीक्षणे नोंदवल्यामुळे सूर्यावरील स्थिती आणि त्याचा अवकाशातील हवामानावर होणारा परिणाम जवळून पाहण्याची संधी मिळेल, असा दावा इस्रोकडून केला जात आहे.









