भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण
वृत्तसंस्था/ चित्रदुर्ग
उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रात जगात भारताने आणखी एक मोठे यश संपादन केले आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या (इस्रो) रीयुजेबल लॉन्च व्हेईकल प्रोटोटाईपने स्वायत्त लँडिंग चाचणी आणि एअर-ड्रॉप लँडिंग प्रयोग रविवारी यशस्वीपणे पूर्ण केले. डीआरडीओ आणि भारतीय हवाई दल (आयएएफ) यांच्या सहकार्याने रविवारी पहाटे कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे एरोनॉटिकल टेस्ट रेंज (एटीआर) वर ही मोहीम पार पडली.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने रविवारी सकाळी पुन्हा वापरता येणारे प्रक्षेपण वाहन अवकाशात पाठवल्यानंतर ते पृथ्वीवर परतले. याद्वारे आणखी एक उपग्रह पुन्हा प्रक्षेपित केला जाऊ शकतो. आतापर्यंत उपग्रह प्रक्षेपण वाहने आकाशात गेल्यावर नष्ट होत होती. सुऊवातीला विंग बॉडीचे विमान हेलिकॉप्टरमधून साडेचार किलोमीटर उंचीवर नेण्यात आले आणि विमानाप्रमाणे धावपट्टीवर उतरण्यासाठी सोडण्यात आल्याची माहिती इस्रोने दिली. ‘आरएलव्ही एलईक्स’ने सकाळी 7.10 वाजता उ•ाण केले. त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच 7.40 वाजता ते चाचणी श्रेणी एअर स्ट्रीपवर उतरले. हवाई पट्टीवर उतरवताना रॉकेटला थांबवण्यासाठी ब्र्रेक पॅराशूट सिस्टिमसह अनेक विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.
खर्चाची मोठी बचत होणार
आरएलव्ही हे भारतीय संरक्षण संशोधन संस्था आणि भारतीय हवाई दलाच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. आरएलव्हीच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर उपग्रह पाठवण्याचा खर्च कमी होईल. तसेच भारताला भविष्यातील उपग्रह प्रक्षेपण मोहिमा कमी खर्चात पूर्ण करणे शक्य होणार आहे. इस्रोच्या म्हणण्यानुसार, आरएलव्ही हे मुळात एक स्पेस प्लेन असून त्याची रचना खूप उंचावरून ताशी 350 किलोमीटर वेगाने लँडिंग करण्यासाठी केली गेली आहे.
भारताच्या यशाकडे जगाचे लक्ष अंतराळ मोहिमांसाठी अनेक देश भारतावर अवलंबित आहेत. अनेक बडे देश भारताचा आधार घेत उपग्रह प्रक्षेपित करत असल्याने या विशेष मोहिमेकडे जगाचे लक्ष लागून राहिले होते. सध्या अनेक मोठे देश पुन्हा वापरण्यायोग्य प्रक्षेपक वाहनांवर काम करत आहेत. एलन मस्क यांची ‘स्पेस एक्स’ ही कंपनी पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपक वाहनाची चाचणी यशस्वी करणारी पहिली खासगी संस्था ठरली होती. ‘स्पेस एक्स’ने 2015 मध्ये पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपक वाहन यशस्वीरित्या उतरवले होते. फ्रान्स, अमेरिका, जपान, चीनसह अनेक खासगी संस्थादेखील पुन्हा वापरण्यायोग्य प्रक्षेपक वाहनांवर काम करत आहेत









