सर्वात मोठय़ा ‘एलव्हीएम-3’ रॉकेटमधून वनवेब उपग्रह अवकाशात ः सलग सहाव्यांदा यशस्वी कामगिरी
वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. रविवार 26 मार्च रोजी येथील सतीश धवन स्पेस सेंटर स्पेसपोर्टवरून एलव्हीएम-3/वनवेब इंडिया-2 मोहीम लाँच करण्यात आली. इस्रोच्या सर्वात मोठय़ा एलव्हीएम-3 रॉकेटने सकाळी 9.00 वाजता दुसऱया प्रक्षेपण पॅडवरून ब्रिटनस्थित कंपनी ‘वनवेब’च्या 36 उपग्रहांसह अवकाशात यशस्वी झेप घेतली.
‘एलव्हीएम-3’ या रॉकेटने सलग सहाव्यांदा यशस्वी कामगिरी केली आहे. इस्रोच्या यशस्वी मोहिमेअंती 36 ‘वनवेब’ उपग्रहांना 450 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत यशस्वीरित्या प्रस्थापित करण्यात आले आहे. या 36 उपग्रहांचे एकूण वजन अंदाजे 5,805 किलो आहे. हे सर्व उपग्रह एकाचवेळी प्रक्षेपित करण्यात आले. मोहिमेसाठी 43.5 मीटर लांबीचे ‘एलव्हीएम-3’ रॉकेट वापरण्यात आले. हे इस्रोचे सर्वात वजनदार रॉकेट आहे. दुसऱया लॉन्चपॅडवरून ते टेक ऑफ झाले. या प्रक्षेपण पॅडवरून यापूर्वी चांद्रयान-2 मोहिमेसह पाच यशस्वी प्रक्षेपणे झाली आहेत. इस्रोने ट्विट करून या मिशनच्या प्रक्षेपणाची माहिती दिली आहे. तसेच या उपग्रहांमुळे स्पेस-आधारित ब्रॉडबँड इंटरनेट सेवाही अधिक वेगवान करण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतराळ क्षेत्रात सातत्याने यश मिळवत आहे. इस्रोचे प्रक्षेपण यशस्वी झाल्यानंतर ब्रिटनस्थित भारती एंटरप्राईझ समर्थित कंपनीचे अंतराळात पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 600 पेक्षा जास्त उपग्रह समूह पूर्ण झाले. नेटवर्क ऍक्सिस असोसिएटेड लिमिटेड म्हणजेच ‘वनवेब’ ही ब्रिटनस्थित कम्युनिकेशन कंपनी आहे. ब्रिटीश सरकारसह भारताची भारती एंटरप्रायझेस, फ्रान्सची युटेलसॅट, जपानची सॉफ्टबँक, अमेरिकेची ह्यूजेस नेटवर्क आणि दक्षिण कोरियाची संरक्षण कंपनी हनव्हा हे त्याचे भागधारक आहेत.
हजार कोटींचा करार
ब्रिटनच्या वनवेब ग्रुप कंपनीने 72 उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोची व्यावसायिक शाखा, न्यूजस्पेस इंडिया लिमिटेडशी करार केला होता. हा करार हजार कोटींचा आहे. या दुसऱया टप्प्यासाठी वनवेबचे 36 उपग्रह 16 फेब्रुवारीलाच फ्लोरिडाहून भारतात पोहोचले होते. या महिन्याच्या सुरुवातीला 9 मार्च रोजी इस्रोच्या रॉकेटने 40 वनवेब उपग्रह अवकाशात पाठवले होते. त्यापूर्वी गेल्यावषी ऑक्टोबरमध्ये श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून वनवेबचे 36 उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले होते.









