एलव्हीएम-3/वनवेब इंडिया-2’ मोहीम : ब्रिटन, अमेरिका, जपानसह 6 कंपन्यांचा सहभाग
► वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) रविवारी, 26 मार्च रोजी येथील सतीश धवन स्पेस सेंटर स्पेसपोर्टवरून एलव्हीएम-3/वनवेब इंडिया-2 मोहीम लाँच करणार आहे. इस्रोचे 43.5 मीटर उंचीचे रॉकेट रविवारी सकाळी 9.00 वाजता दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरून ब्रिटनस्थित कंपनी ‘वनवेब’चे 36 उपग्रहांसह मार्गक्रमण करेल. या 36 उपग्रहांचे एकूण वजन अंदाजे 5,805 किलो आहे.
नेटवर्क अॅक्सिस असोसिएटेड लिमिटेड म्हणजेच वनवेब ही ब्रिटनस्थित कम्युनिकेशन कंपनी आहे. ब्रिटीश सरकारसह भारताची भारती एंटरप्रायझेस, फ्रान्सची युटेलसॅट, जपानची सॉफ्टबँक, अमेरिकेची ह्यूजेस नेटवर्क आणि दक्षिण कोरियाची संरक्षण कंपनी हनव्हा हे त्याचे भागधारक आहेत.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतराळ क्षेत्रात सातत्याने यश मिळवत आहे. इस्रो रविवारी 36 वनवेब उपग्रहांची दुसरी तुकडी प्रक्षेपित करणार आहे. शनिवारपासून या मोहीमेची उलटगणती सुरू झाली. सतीश धवन स्पेस सेंटर स्पेसपोर्टने चांद्रयान-2 मोहिमेसह आतापर्यंत पाच यशस्वी उड्डाणे केली आहेत. इस्रोचे प्रक्षेपण यशस्वी झाल्यास ब्रिटनस्थित भारती एंटरप्राईझ समर्थित कंपनी अंतराळात पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 600 पेक्षा जास्त उपग्रह समूह पूर्ण करेल. तसेच या उपग्रहांमुळे स्पेस-आधारित ब्रॉडबँड इंटरनेट सेवाही अधिक वेगवान करण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.
‘वनवेब’सोबत हजार कोटींचा करार
उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने वनवेबसोबत हजार कोटींचा करार केला आहे. वनवेबचे 36 उपग्रह 16 फेब्रुवारीलाच फ्लोरिडाहून भारतात पोहोचले होते. रविवारी श्रीहरिकोटा येथून 18 व्या प्रक्षेपणात 36 उपग्रह सोडले जातील. हे उपग्रह ब्रिटनस्थित कंपनीच्या 582 उपग्रहांच्या विद्यमान गटात सामील होतील. या महिन्याच्या सुऊवातीला 9 मार्च रोजी इस्रोच्या रॉकेटने 40 वनवेब उपग्रह अवकाशात पाठवले होते. त्यापूर्वी गेल्यावषी ऑक्टोबरमध्ये श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून वनवेबचे 36 उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले होते.









