गगनयान मोहिमेसाठी इस्रोची तयारी जोरात
वृत्तसंस्था/ बेंगळूर
गगनयान मोहिमेसंदर्भात इस्रोला पुन्हा एकदा मोठे यश मिळाले आहे. ‘गगनयान’साठी विकास लिक्विड इंजिन चालू केल्यानंतर इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सेंटर, बेंगळूरने क्रू मॉड्यूल श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात पाठवले आहे. गगनयान हे देशातील पहिले मानवी अंतराळ उड्डाण अभियान आहे. या मोहिमेंतर्गत भारताने चालू वर्षात 400 किमीपर्यंत अंतराळवीर पाठवण्याची तयारी चालवली आहे.
21 जानेवारी 2025 रोजी इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स सेंटरने (एलपीएससी) लिक्विड प्रोपल्शन सिस्टम पूर्ण केल्यानंतर गगनयानच्या (जी1) पहिल्या मानवरहित मोहिमेसाठी क्रू मॉड्यूल लाँच केले, असे इस्रोने म्हटले आहे. बेंगळूरस्थित ‘एलपीएससी’मधून हे मॉड्यूल श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात पाठविल्याची माहिती बुधवारी देण्यात आली.
क्रू मॉड्यूल प्रोपल्शन सिस्टम (सीएमपीएस) ही बाय-प्रोपेलंट आधारित रिअॅक्शन कंट्रोल सिस्टम (आरसीएस) आहे, असे अंतराळ संस्थेने म्हटले आहे. पिच, यॉ आणि रोल या तीन अक्षांवर क्रू मॉड्यूलचे अचूक नियंत्रण प्रदान करणे हा त्याचा उद्देश आहे. या प्रणालीमध्ये 100एन थ्रस्टर, उच्च दाबाच्या गॅस बाटल्यांसह प्रेशरायझेशन प्रणाली आणि संबंधित द्रव नियंत्रण घटकांसह प्रोपल्शन फीड प्रणाली समाविष्ट आहे, असे इस्रोने म्हटले आहे. 100एन थ्रस्टर हे रॉकेट मोटर्स असून ते अंतराळयानात प्रणोदनासाठी वापरले जातात.
भारताची गगनयान मोहीम तीन दिवसांची आहे. इस्रोच्या मते, गगनयान प्रकल्पात, तीन सदस्यांची टीम तीन दिवसांच्या मोहिमेसाठी 400 किमी उंचीवर पाठवली जाईल. ते कक्षेत सोडून नंतर भारतीय सागरी हद्दीत उतरवले जाईल. त्यानंतर मानवांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणून अंतराळ उड्डाण क्षमता प्रदर्शित करण्याची कल्पना आहे. यासाठी इस्रो वेगाने तयारी करत आहे.









