जीएसएलव्ही-एफ 15 रॉकेट प्रक्षेपणाचे काउंटडाउन सुरू : नेव्हिगेशन प्रणाली होणार अधिक मजबूत
वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
इस्रोची 100 वी मिशन जीएसएलव्ही-एफ 15 रॉकेटसोबत उपग्रह एनव्हीएस-02 प्रक्षेपित करण्याचा काउंटडाउन सुरू झाला आहे. स्वदेशी क्रायोजेनिक स्टेजयुक्त रॉकेटला 29 जानेवारी रोजी सकाळी 6.23 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातील दुसऱ्या लाँच पॅडवरून प्रक्षेपित केले जाणार आहे. 27 तासांचा काउंटडाउन पूर्ण झाल्यावर रॉकेट उपग्रहासोबत रवाना होणार आहे. याचबरोबर इस्रोचे नवे अध्यक्ष व्ही. नारायणन यांच्या कार्यकाळातील ही पहिली मोहीम ठरणार आहे. नारायणन यांनी 13 जानेवारी रोजी पदभार स्वीकारला होता.
जीएसएलव्ही-एफ15, एनव्हीएस-02 उपग्रहाला भू-स्थिर स्थानांतरण कक्षेत स्थापित करणार आहे. याची 27.30 तासांची उलटी गणना मंगळवारी पहाटे 02.53 वाजता सुरू झाली. इस्रोनुसार नाविक (नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टीलेशन) भारताची स्वतंत्र क्षेत्रीय नेव्हिगेशन उपग्रह सिस्टीम आहे. याचा उद्देश भारत आणि भारतीय भूमीपासून 1500 किलोमीटरपर्यंत फैलावलेल्या क्षेत्रात वापरकर्त्यांना अचूक पोझिशन, वेलोसिटी आणि टायमिंग सेवा प्रदान करणे असल्याचे इस्रोने सांगितले आहे. नाविक दोन प्रकारच्या सेवा प्रदान करणार आहे. स्टँडर्ड पोझिशनिंग सर्व्हिस (एसओएस) आणि रेस्ट्रिक्टेड सर्व्हिस असे दोन प्रकार असणार आहेत.
नाविक उपग्रह प्रणाली भारताच्या नेव्हिगेशन सेवांमध्ये स्व-निर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. नाविकच्या सेवा भारतीय उद्योगांना आर्थिक लाभ प्रदान करू शकतात. नाविक भारतीय क्षेत्रात नेव्हिगेशन सेवा प्रदान करणार आहे, यामुळे विदेशी नेव्हिगेशन प्रणालींवरील निर्भरता कमी होणार आहे. नाविक अचूक आणि विश्वसनीय स्थिती आणि टाइम सेवा प्रदान करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे.
यूआर सॅटेलाइट सेंटरकडून डिझाईन आणि विकसित एनव्हीएस-02 उपग्रहाचे वजन सुमारे 2250 किलोग्रॅम आहे. यात एल1, एल5 आणि एस बँडमध्ये नेव्हिगेशन पेलोडसोबत सी-बँडमध्ये रेंजिंग पेलोडही लावण्यात आला आहे. एनव्हीएस-01 या याच्या पहिल्या पिढीच्या उपग्रहातही हीच संरचना करण्यात आली होती.
एनव्हीएस सीरिजचा दुसरा उपग्रह
एनव्हीएस-01 हा दुसऱ्या पिढीचा पहिला उपग्रह होता. 29 मे 2023 रोजी जीएसएलव्ही-एफ12 द्वारे तो प्रक्षेपित करण्यात आला होता. तर एनव्हीएस-02 हा एनव्हीएस सीरिजचा दुसरा उपग्रह आहे. एनव्हीएस-0102/03/04/05 ला नेव्हिगेशन सेवांची निरंतरता सुनिश्चित करण्यासाठी आणि बेस लेयर कॉन्स्टिलेशनला आणखी मजबूत करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. उपग्रहाचा वापर भूमीय, हवाई आणि सागरी नेव्हिगेशन, अचूक कृषी, मोबाईल उपकरणांमध्ये लोकेशन आधारित सेवा, उपग्रहांसाठी कक्षा निश्चिती, इंटरनेट- ऑफ-थिंग्स आधारित प्रयोग, आपत्कालीन सेवा प्रदान करण्यासाठी केला जाणार असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले.









