रशियाच्या राष्ट्रपतींचा बदलला सूर : गाझामधील संघर्ष तीव्र
वृत्तसंस्था/ बिस्केक
गाझामध्ये हमाससोबत सुरु असलेला संघर्ष तीव्र झाल्यावर रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचे सूर बदलले आहेत. हमासच्या अत्याधिक क्रूरतेमुळे इस्रायलला स्वत:च्या रक्षणाचा अधिकार आहे. परंतु एक स्वतंत्र पॅलेस्टाइन देशच या समस्येवरील उपाय असून याची राजधानी पूर्व जेरुसेलम असावी असेही पुतीन यांनी म्हटले आहे. किर्गिस्तानच्या दौऱ्यावर पोहोचलेले पुतीन यांनी चर्चा करून तोडगा काढण्याशिवाय इस्रायल-पॅलेस्टाइन वाद सोडविण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याचे नमूद पेले आहे. तर यापूर्वी पुतीन यांनी इस्रायलच्या कारवाईवर टीका केली होती.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या दोन देशांच्या सूत्राला लागू करणे हा या चर्चेचा उद्दे असावा. या सुत्रानुसार एक स्वतंत्र पॅलेस्टाइन देश असेल आणि त्याची राजधानी पूर्व जेरुलसेम असणार आहे. तसेच नवा देश इस्रायलसोबत शांतता अन् सुरक्षेसोबत राहणार आहे. इस्रायलवर हमासने केलेले हल्ले हे अत्यंत क्रूर आहेत. निश्चितपणे इस्रायलला स्वत:च्या रक्षणाचा अधिकार आहे. इस्रायलकडे शांततापूर्ण सह-अस्तित्व सुनिश्चित करण्याचा अधिकार असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे.
इस्रायल-पॅलेस्टाइन समस्येवर तोडगा शांततेच्या मार्गाने निघावा याकरता काम करण्याची गरज आहे. दोन देशांच्या स्थापनेशिवाय अन्य कुठलाही मार्ग नसल्याचे माझे मानणे असल्याचे पुतीन यांनी सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून अटक वॉरंट बजावण्यात आल्यावर पुतीन हे पहिल्यांदाच विदेश दौऱ्यावर पोहोचले आहेत. यापूर्वी पुतीन यांनी इस्रायलवर टीका केली होती.









