हमास पुन्हा मोठ्या हल्ल्याच्या तयारीत : लेबनॉनमधील हिजबुल्लाहची संघर्षात उडी : युद्धात शेकडोंची जीवितहानी
इस्रायलच्या प्रत्युत्तर कारवाईने गाझापट्टी उद्ध्वस्त : ‘हमास’ हस्तकांकडून अनेकजण ओलीस
वृत्तसंस्था/ जेरुसलेम
इस्रायल आणि हमास यांच्यात सलग दुसऱ्या दिवशीही युद्ध सुरू राहिले. एकीकडे इस्रायली सैन्य गाझा पट्टीवर हल्ले करत असतानाच दुसरीकडे हमासचे दहशतवादी इस्रायलमध्ये दहशत पसरवत आहेत. हमासने इस्रायलमधील परदेशी लोकांनाही सोडले नाही. नेपाळचे 10 नागरिक हमासच्या हल्ल्यात मारले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. हमासचे हस्तक सतत इस्रायलमध्ये राहणाऱ्या लोकांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले करत आहेत. इस्रायलवर हमासच्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या 300 हून अधिक झाली आहे, असे टाईम्स ऑफ इस्रायलने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हवाला देत म्हटले आहे. तर इस्रायलने गाझा पट्टीत केलेल्या बॉम्बवर्षावातही मोठी जीवितहानी झाली आहे. तसेच इस्रायलच्या सैन्याने ‘हमास’चे 400 हून अधिक दहशतवादी ठार केल्याचा दावाही करण्यात येत आहे. लेबनॉनमध्ये सक्रीय हिजबुल्लाहने इस्रायलच्या दिशेने रॉकेट्स डागली आहेत. याच्या प्रत्युत्तरादाखल इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या तळाला नष्ट केले आहे.

गाझा पट्टीवर बऱ्याचअंशी नियंत्रण मिळविलेल्या हमास या दहशतवादी संघटनेने शनिवारी इस्रायलवर अभूतपूर्व हल्ला करत हजारो रॉकेट डागले. याशिवाय हमासचे डझनभर दहशतवादी अत्यंत सुरक्षित सीमा ओलांडून इस्रायलमध्ये घुसले. हमासने इस्रायलच्या सर्वात मोठ्या शहर तेल अवीववर हल्ले सुरूच ठेवले आहेत. हमासने शनिवारी मध्यरात्री तेल अवीववर पुन्हा 150 हून अधिक रॉकेट डागले. यानंतर इस्रायलने प्रत्युत्तर देत गाझामध्ये हवाई हल्ले केले. गाझामध्ये इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल हल्ल्यात किमान 198 लोक ठार झाले आणि 1,610 जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी हमासचा खात्मा करण्याची शपथ घेतली आहे.
इस्रायलमध्ये हमासचे दहशतवादी अजूनही हल्ले करत आहेत. हमासच्या हल्ल्यात किमान 150 लोक ठार झाले असून शेकडो जखमी झाले आहेत. त्याचवेळी, गाझामधील मृतांच्या संख्येबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही. मात्र पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने 198 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. दरम्यान, हमासने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये काही इस्रायलींना जिवंत पकडण्यात आलेले दिसत आहे. अजूनही हमासचे काही दहशतवादी इस्रायलमध्ये असल्याच्या बातम्या येत आहेत.
400 हून अधिक पॅलेस्टिनींचा खात्मा
सध्या सुरू असलेला संघर्ष इस्रायलमधील गेल्या काही वर्षांतील सर्वात प्राणघातक हल्ला ठरला आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या लढाईत लष्कराने 400 हून अधिक पॅलेस्टिनी दहशतवाद्यांना ठार केले आणि दक्षिण इस्रायल आणि गाझा पट्टीमध्ये अनेक हस्तकांना ताब्यात घेतले, असे इस्रायलचे लष्करी प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हगारी यांनी सांगितले. सध्या अनेक ठिकाणी इस्रायली सैन्य लढत आहे. मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये शोध सुरू आहेत. सर्व शहरांमध्ये आयडीएफ फोर्स आहेत, असे एकही शहर नाही जिथे इस्रायली सैन्य नाही. गाझा सीमेवरील शहरांमधून सर्व रहिवाशांना बाहेर काढणे, इस्रायली हद्दीवरील लढाई संपवणे, सुरक्षा कुंपणातून होणारी घुसखोरी नियंत्रित करणे आणि गाझा पट्टीतील दहशतवादी लक्ष्यांवर हल्ले सुरू ठेवणे हे लष्कराचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
ठिकठिकाणी मृतदेहांचा खच
मृत इस्रायली नागरिकांचे आणि हमासच्या हस्तकांचे मृतदेह इस्रायली शहरांच्या रस्त्यांवर दिसत होते. काही छायाचित्रांमध्ये हमासचे बंदूकधारी पकडलेले सैनिक आणि नागरिकांना मोटारसायकलवरून गाझामध्ये आणताना दिसले. तसेच, यामध्ये इस्रायली लष्करी वाहने रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्याचवेळी, एका व्हिडिओमध्ये, एका इस्रायली सैनिकाचा मृतदेह गाझामध्ये पॅलेस्टिनींचा संतप्त जमाव ओढून नेत असल्याचेही दृश्य दिसून आले. एकंदर दोन्ही बाजूंनी तुंबळ संघर्ष सुरू असून सर्वसामान्य लोकांची ससेहोलपट सुरू असल्याची स्थिती निदर्शनास येत आहे.
इस्रायलच्या तीन मोठ्या घोषणा…
पंतप्रधान नेतन्याहू यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत. पहिली म्हणजे इस्रायलमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करणे. तसेच हल्ला झालेल्या भागात व समुदायांमध्ये सुरक्षा आणि शांतता पुनर्संचयित करणे. दुसरी म्हणजे गाझा पट्टीतील शत्रूला सडेतोड प्रत्युत्तर देणे. आणि तिसरे, सर्व आघाड्या मजबूत करणे, जेणेकरून चुकूनही कोणीही या युद्धात अडकू नये.
भारतीय नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला
इस्रायलच्या दक्षिणेतील युद्धसदृश परिस्थिती पाहता इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील भारतीय दुतावासाने शनिवारी सर्व भारतीय नागरिकांना “दक्ष राहा” आणि “सुरक्षा नियमांचे पालन करा” असा सल्ला दिला. “इस्रायलमधील सध्याची परिस्थिती पाहता, तेथे उपस्थित असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याची आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार सुरक्षा नियमांचे पालन करण्याची विनंती केली जाते. कृपया सावधगिरी बाळगा, अनावश्यक हालचाली टाळा आणि सुरक्षित ठिकाणांजवळ रहा, असे भारतीय दुतावासाने म्हटले आहे.









