नवी दिल्ली / वृत्तसंस्था
इस्रायलची संसद विसर्जित करण्यात आली आहे. संसदेमध्येच यासंबंधी मतदान घेण्यात आले आणि त्या मतदानाच्या आधारावर संसद विसर्जित करण्यात आली. त्यामुळे आता त्या देशात संसदीय निवडणूक होणार असून ती येत्या नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. ही गेल्या चार वर्षांमधील पाचवी निवडणूक असेल. निवडणूक होईपर्यंत सध्या परराष्ट्र व्यवहार विभागाची सूत्रे सांभाळणारे याईर लापीड हे कार्यकारी पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळतील. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ते हे पद सांभाळतील. या देशाचे ते आतापर्यंतचे 14 वे कार्यकारी पंतप्रधान असतील. याईर लापीड हे सध्या सरकारमध्ये असलेल्या युतीचे शिल्पकार आहेत. हे सरकार एक वर्ष सत्तेवर आहे. सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम करणारे बेंजामिन नेतानयाहू यांच्या युतीचा निसटता पराभव करुन ही नवी युती सरकारमध्ये स्थानापन्न झाली होती. या युतीजवळ केवळ एका सदस्याचे बहुमत होते. मात्र, अंतर्गत मतभेदांमुळे हे सरकारही कोसळल्यानंतर नव्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली. ही निवडणूक 1 नोव्हेंबरला होईल.









