12 पॅलेस्टिनींचा मृत्यू : 100 जखमी
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायल अणि पॅलेस्टाइनदरम्यान जेनिन शहरात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या तणावादरम्यान मंगळवारी इस्रायलच्या सैन्याने वेस्ट बँकेतून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. सैन्याच्या दोन दिवसांच्या मोहिमेत सुमारे 12 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या मोहिमेदरम्यान एका इस्रायली सैनिकाचाही मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या मोहिमेमुळे जेनिन येथील शरणार्थी शिबिर नष्ट झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
जेनिन येथून इस्रायलच्या सैन्याने माघार घेतल्यावर मंगळवारी रात्री उशिरा गाझापट्टी येथून इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रs डागण्यात आली. होणारे हल्ले पाहता दक्षिण इस्रायलमध्ये अलर्ट सायरन वाजविण्यात आला आणि आयर्न डोम सक्रीय करण्यात आला. गाझाच्या दिशेकडून आलेली 5 रॉकेट्स आकाशातच नष्ट केल्याची पुष्टी इस्रायलने दिली आहे. यानंतर इस्रायलकडून गाझापट्टी आणि हमासच्या तळांवर पुन्हा हवाईहल्ले करण्यात आले. गाझापट्टीतून बुधवारी इस्रायलवर आणखी रॉकेट्स डागण्यात आली होती, परंतु आयर्न डोमने हे सर्व हल्ले रोखले आहे.
दहशतवाद विरोधी लढाई सुरूच राहणार
याचदरम्यान तेल अवीवमध्ये एका हमास समर्थकाने स्वत:ची कार बसस्टॉपमध्ये घुसवून लोकांवर चाकूने हल्ला केला आहे. या हल्ल्यात 8 जण जखमी झाले आहेत. अशाप्रकारचे हल्ले दहशतवादविरोधातील आमची लढाई रोखू शकत नाहीत. आमचे सैन्य मोहीम फत्ते करून तूर्तास परतत आहे, परंतु गरज भासल्यास आम्ही पुन्हा गाझापट्टीत शिरू असे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी म्हटले आहे.
हमासकडून प्रत्युत्तर
इस्रायलकडून होणारे हल्ले हे भूभागावर कब्जा करण्याच्या उद्देशाने केले जात आहेत. तेल अवीव येथील हल्ल्यासाठी इस्रायलचे सैन्यच जबाबदार आहे. जेनिनमध्ये इस्रायलने पेलेल्या गुन्ह्याचा परिणाम म्हणजे तेल अवीव येथील हल्ला असल्याचे वक्तव्य हमासचे नेते ओसामा हमदान यांनी केले आहे.