‘दहशतवादी मास्टर’ इस्माईल हनियाच्या घरावर डागली क्षेपणास्त्रे
► वृत्तसंस्था/ गाझा सिटी
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या 29 व्या दिवशी इस्रायलने हमासवर सर्वात मोठा हल्ला चढवत मुख्य सूत्रधारालाच टार्गेट केले. इस्रायली सैन्याने हमास प्रमुख इस्माइल हनिया यांच्या घरावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. इस्रायली ड्रोनने इस्माईल हनियाच्या गाझा सिटीतील घरावर क्षेपणास्त्र डागल्याची माहिती शनिवारी अल-अक्सा रेडिओने दिली. मात्र, या हल्ल्यावेळी ते घरी उपस्थित नव्हते. त्यांचे कुटुंब तेथे राहत होते, परंतु हल्ल्याच्या वेळी कोणीही सदस्य उपस्थित होता की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. हमासचा राजकीय प्रमुख इस्माइल हानिया 2019 पासून तुर्की आणि कतारमधील गाझा पट्टीच्या बाहेर राहतो.
इस्रायलने गाझा शहराला चारही बाजूंनी घेरले आहे. दोन दिवसांत हमासचे 150 हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. अमेरिकन ड्रोन बोगद्यांजवळ ओलिसांचा शोध घेत आहेत. इस्रायली सैन्याने गाझावर थेट हल्ला केला सुरू केल्यापासून गाझाला तिन्ही बाजूंनी वेढले जात आहे. इस्रायलने गाझाचे दोन भाग केले आहेत. आतापर्यंत 1000 हमास दहशतवाद्यांना ठार केले आहे, तसेच 24 सैनिक मारले गेल्याचा दावा इस्रायलने केला आहे. मृतांचा आकडाही सातत्याने वाढत आहे. एकट्या गाझामध्ये 10 हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत, तर इस्रायलमध्ये 1400 लोकांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंतच्या युद्धात गाझापट्टीच्या जमिनीवर उतरलेले इस्रायली सैन्य दहशतवाद्यांचे लपून बसेल अशा प्रत्येक ठिकाणी हल्ले करत आहेत. या मालिकेत इस्रायलने गाझामधील सर्वात मोठे ऊग्णालय अल-शिफा येथे हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर ऊग्णालयाबाहेर लोक रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे छायाचित्रांमध्ये दिसून आले होते. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा इस्रायली सैन्याने थेट अल-शिफा बाहेर ऊग्णवाहिकांच्या ताफ्यावर हल्ला केला होता.









