40 हजार पॅलेस्टिनी शरणार्थींचे शिबिरातून पलायन : पुन्हा युद्ध सुरू करण्यास तयार इस्रायल
वृत्तसंस्था/ जेरूसलेम
इस्रायलच्या कब्जात असलेल्या वेस्ट बँकमधील शहर जेनिनमध्ये इस्रायलच्या सैन्याने रणगाडे तैनात केले आहेत. 23 वर्षांनी इस्रायलच्या सैन्याचे रणगाडे वेस्ट बँकमध्ये दाखल झाले. यापूर्वी 2002 मध्ये असा प्रकार घडला होता. जेनिनमध्ये मागील अनेक वर्षांपासून इस्रायलच्या विरोधात सशस्त्र संघर्ष होत राहिला आहे. जेनिननजीक एक रणगाडा डिव्हिजन तैनात केल्याचे इस्रायली डिफेन्स फोर्सने सांगितले. एका डिव्हिजनमध्ये 40-60 रणगाडे असतात. इस्रायलने
पॅलेस्टाइनच्या जेनिन, तुलकरम आणि नूर शम्समध्ये शरणार्थी शिबिरांना रिकामी करविले आहे. या शिबिरांमध्ये पॅलेस्टिनी नागरिकांनी आश्रय घेतला होता. या तिन्ही शिबिरांममधून 40 हजार पॅलेस्टिनींना हाकलण्यात आले आहे. इस्रायलने 21 जानेवारीपासून त्यांना तेथून हटवण्यास सुरुवात केली होती. 1967 च्या इस्रायल-अरब युद्धानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येत पॅलेस्टिनी नागरिक विस्थापित झाले आहेत.
तसेच येथे संयुक्त राष्ट्रसंघाची मानवाधिकार संस्था युएनआरडब्ल्युएला देखील काम बंद करण्याचा निर्देश देण्यात आला आहे. संरक्षणमंत्री इस्रायल काट्ज यांनी सैन्याला पुढील काही वर्षे वेस्ट बँकच्या शरणार्थी शिबिरांमध्ये राहण्याची सूचना केली आहे. दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी हे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इस्रायल-हमास युद्धादरम्यान वेस्ट बँकमध्ये हिंसा वाढली आहे. इस्रायलमध्ये वेस्ट बँकेच्या दिशेकडून होणारे हल्ले देखील वाढले आहेत. इस्रायलमध्ये 20 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा 3 रिकामी बसेसमध्ये विस्फोट झाले होते. वेस्ट बँकमधूनच इस्रायलच्या बसेसमध्ये स्फोट घडवून आणण्याचा कट रचण्यात आला होता, असे तपासात समोर आले आहे. याचमुळे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी या भागात कारवाई करण्याचा आदेश दिला. परंतु इस्रायल-हमास युद्धादरम्यान देखील इस्रायलच्या सैन्याने येथे अनेक मोहिमांना मूर्त रुप दिले आहे.
58 वर्षांपासून इस्रायलच्या ताब्यात
वेस्ट बँक हा भूभाग जॉर्डनच्या पश्चिमेला तर जेरूसलेमच्या पूर्व दिशेला आहे. 1948 मध्ये अरब-इस्रायल युद्धानंतर जॉर्डनने यावर कब्जा केला होता. जॉर्डन नदीच्या पश्चिम दिशेला हा भूभाग असल्याने तेव्हा याचे नाव वेस्ट बँक ठेवण्यात आले होते. 1967 मध्ये 6 दिवसांपर्यंत चाललेल्या युद्धानंतर इस्रायलने या भूभागाला जॉर्डनकडून मिळविले होते. तेव्हापासून वेस्ट बँकेवर इस्रायलचा कब्जा कायम आहे. या भूभागात 30 लाखाहून अधिक लोक राहतात. यातील बहुतांश जण पॅलेस्टिनी आहेत. इस्रायलने वेस्ट बँकेत अनेक ज्यू वसाहतीही निर्माण केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार येथे निर्माण करण्यात आलेल्या इस्रायली वसाहती अवैध आहेत.
पुन्हा युद्ध सुरू करण्यास तयार
इस्रायल गाझापट्टीत कुठल्याही क्षणी पुन्हा युद्ध सुरू करण्यास तयार आहे. चर्चा असो किंवा अन्य मार्गांनी आम्ही युद्धाचा उद्देश पूर्ण करूच, असे वक्तव्य इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी केले आहे. हमासने शनिवारी 6 इस्रायली अपहृतांची मुक्तता केली होती. याच्या बदल्यात इस्रायलने 600 पॅलेस्टिनी कैद्यांची मुक्तता करणे अपेक्षित होते, परंतु असे घडले नाही. अपमानास्पद सोहळ्यांशिवाय पुढील अपहृतांची मुक्तता होत नाही तोवर पॅलेस्टिनी कैद्यांना सोडले जाणार नाही, असे नेतान्याहू यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.









