गाझामध्ये युद्धविराम लागू : ओलिसांची मुक्तता होणार
वृत्तसंस्था/तेल अवीव
इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम करार लागू झाला आहे. याची औपचारिक घोषणा इस्रायल डिफेन्स फोर्सने शुक्रवारी केली. याचबरोबर 2 वर्षांपासून जारी गाझा युद्ध अधिकृत स्वरुपात समाप्त झाले. या कराराच्या अंतर्गत काही भागांमधून सैनिकांना मागे बोलाविण्यात येत आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबर 2023 रोजी क्रूर हल्ला केल्यावर हा संघर्ष सुरू झाला होता. दहशतवादी हल्ल्यात कमीतकमी 1200 जणांचा मृत्यू झाला होता तर 250 हून अधिक जणांचे अपहरण करण्यात आले होते.
गाझामध्ये युद्धविराम शुक्रवारी दुपारी 12 वाजता (इस्रायलच्या प्रमाणवेळेनुसार) म्हणजेच भारतीय प्रमाणेवेळेनुसार दुपारी 2.30 वाजता लागू झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 20 सूत्री शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या हिस्सा म्हणून हे पाऊल उचलण्यात आले असून यावर इस्रायल आणि हमास दोघांनीही सहमती दर्शविली आहे. युद्धविराम करार लागू झाल्यावर आयडीएफ सैनिकांनी स्वत:च्या नव्या तैनात रेषेवर जात गस्त सुरू केली आहे. यामुळे युद्धविराम लागू होत ओलिसांच्या मुक्ततेची प्रक्रिया सुरू होऊ शकणार आहे. दक्षिण कमांडचे सैनिक क्षेत्रात तैनात असून कुठल्याही तात्कालिक धोक्याला समाप्त करण्याची कारवाई जारी ठेवणार असल्याचे आयडीएफने म्हटले आहे.
काय आहे शांतता करार?
शांतता कराराच्या अंतर्गत इस्रायल गाझामधून हळूहळू स्वत:चे सैन्य हटवत आहे, यामुळे लढाई संपुष्टात येणार आहे. तर इस्रायलच्या तुरुंगात कैद शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात सर्व जिवंत ओलिसांची मुक्तता करण्याचे आश्वासन हमासने दिले आहे. तर ओलिसांची मुक्तता पुढील आठवड्यात सुरू होण्याची अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. या करारानंतर मोठी मानवीय मदत मोहीम सुरू होणार असून याच्या अंतर्गत अन्नधान्य, औषधे आणि आवश्यक सामग्रीने भरलेले ट्रक गाझामध्ये पाठविले जातील. इस्रायलच्या कारवाईत स्वत:चे घर गमाविलेल्या आणि सध्या तात्पुरत्या शिबिरांमध्ये राहणाऱ्या लाखो लोकांना यामुळे मदत मिळणार आहे.









