हमाससोबतचे युद्ध सुरू होण्यापूर्वी मिळाली ऑर्डर
वृत्तसंस्था /कन्नूर
इस्रायल-हमास युद्धादरम्यान केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील एक कंपनी इस्रायलच्या पोलिसांसाठी गणवेश तयार करत आहे. सुमारे 8 वर्षांपूर्वी या कंपनीसोबत इस्रायलचा करार झाला होता. तेव्हापासून दरवर्षी ही कंपनी इस्रायलच्या पोलीस विभागाला सुमारे 1 लाख शर्ट्सचा पुरवठा करत आहे. या कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे. इस्रायलचे वरिष्ठ अधिकारी, डिझायनर्स आणि गुणवत्ता निरीक्षकांनी कन्नूर येथील कंपनीच्या प्रकल्पाला भेट दिली होती. या पथकाने 10 दिवसांपर्यंत प्रकल्पातील कामकाजाची पाहणी केली होती. कराराच्या अंतर्गत कंपनी इस्रायलच्या पोलिसांसाठी निळ्या रंगाचे फूल स्लीव शर्ट्स पुरविते. कंपनीने शर्टावर डबल पॉकेट्ससोबत इस्रायल पोलिसांचे प्रतीक चिन्हही डिझाइन केले आहे. गणवेश तयार करणाऱ्या कंपनीला 2006 साली तिरुअनंतपुरम येथील किन्फ्रा पार्कमध्ये सुरू करण्यात आले होते. त्यानंतर स्थानिक लोकांना रोजगार देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प कन्नूर येथे हलविण्यात आला होता.









