140 हून अधिक ठिकाणांवर हवाई-जमीन-सागरी हल्ले
वृत्तसंस्था/ गाझा सिटी
इस्रायली संरक्षण दलांनी सोमवारी दुपारपर्यंतच्या 24 तासांत गाझा पट्टीमध्ये 140 हून अधिक दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याने पुन्हा एकदा मोठी दहशत निर्माण झाली आहे. या हल्ल्यांमध्ये लष्करी तुकड्या, लढाऊ गट, शस्त्रास्त्रs डेपो, कमांड सेंटर आणि दहशतवादी गटांच्या सदस्यांना लक्ष्य करण्यात आले. या कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेले असले तरी नेमकी संख्या उघड करण्यात आलेली नाही.
गाझापट्टीत इस्रायली लष्करी हल्ले सुरूच आहेत. याचदरम्यान रविवारी मध्यरात्री इस्रायलमधील लष्करी जवान आणि हवाई दलाने संयुक्तपणे गाझा शहरातील लष्करी इमारती आणि लढाऊ छावण्या नष्ट केल्या. याव्यतिरिक्त संशयास्पद तळांवर वेढा घालताना रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रs डागणाऱ्या अनेक दहशतवाद्यांनाही ठार केल्याचे समजते. इस्रायलने दक्षिण गाझामधील दहशतवाद्यांचा खात्मा करतानाच पाळत ठेवणारी उपकरणे आणि लष्करी पायाभूत सुविधाही नष्ट केल्याने त्यांना मोठा दणका बसल्याचे दिसून येत आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील जवळजवळ तीन वर्षांच्या संघर्षात 66,000 हून अधिक पॅलेस्टिनींनी आपले प्राण गमावले आहेत. गाझा आरोग्य मंत्रालयाने रविवारी ही आकडेवारी जाहीर केली.
मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या युद्धात मारल्या गेलेल्या पॅलेस्टिनींची संख्या 66,005 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 1,68,162 पॅलेस्टिनी जखमी झाले आहेत. यामध्ये गेल्या 24 तासात रुग्णालयात दाखल झालेल्या 79 जणांचा समावेश आहे.
दरम्यान, सप्टेंबरच्या सुरुवातीला कतारची राजधानी दोहा येथे इस्रायलने हमासच्या वाटाघाटी पथकावर हल्ला केल्यापासून गाझामधील युद्धबंदी चर्चा पुढे ढकलण्यात आल्याचा दावा हमासने केला आहे. मध्यस्थांकडून त्यांना कोणतेही नवीन प्रस्ताव मिळालेले नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे. रविवारी जारी केलेल्या निवेदनात हमासने मध्यस्थांकडून येणाऱ्या कोणत्याही सूचनांचा सकारात्मक विचार करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.









