गाझा सिटी सेंटरसह संसदेवरही ताबा
वृत्तसंस्था/ गाझा, तेल अवीव
इस्रायली सैन्याने बुधवारी गाझामधील सर्वात मोठ्या आणि अलीकडे चर्चेत आलेल्या अल-शिफा रुग्णालयात प्रवेश केला. त्याचबरेबर गाझा सिटी सेंटर आणि संसदेवरही ताबा मिळविल्याचे सांगण्यात आले. इस्रायली सैनिक आणि हमासच्या लढवय्यांमध्ये रुग्णालयातही चकमक सुरू होती. इस्रायली लष्कराने हमास या दहशतवादी संघटनेला आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. या रुग्णालयाच्या खाली हमासचा तळ असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. त्याच वेळी, 2300 लोक रुग्णालयात असल्याची माहिती समोर आली आहे.
आम्ही अल-शिफा हॉस्पिटलमधील निवडक ठिकाणी हमासच्या विरोधात कारवाई सुरू केली असल्याचे इस्रायल संरक्षण दलाने सांगितले. मात्र, किती इस्रायली सैनिक रुग्णालयात दाखल झाले आहेत, हे अद्याप कळू शकलेले नाही. उत्तर गाझावर लष्कराने ताबा मिळवला असल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी केला आहे. भूमिगत भुयारांमध्ये हमासचे सैनिक लपून बसले आहेत. सदर छुप्या भुयारांचा शोध घेण्याचा प्रयत्न इस्रायली सैन्याकडून सुरू आहे. तसेच गाझा सिटी सेंटर आणि संसदेवरही कब्जा केला आहे. इस्रायलने रुग्णालयाला वेढा घातल्याचे रुग्णालय प्रशासनानेही स्पष्ट केले आहे. याचदरम्यान, अल शिफा रुग्णालयात पडलेल्या पॅलेस्टिनी लोकांचे मृतदेह एक मोठी कबर खोदून त्यात पुरण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.
अमेरिकेकडून ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्यानंतरच इस्रायलने हॉस्पिटलवर हल्ला केल्याचे दहशतवादी संघटना हमासने बुधवारी सांगितले. या कारवाईला इस्रायल आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन जबाबदार असल्याचा आरोप हमासने केला आहे.
आतापर्यंत 11 हजार लोकांचा मृत्यू
इस्रायल-हमास युद्ध सुरू होऊन 40 दिवस झाले आहेत. युद्धानंतर गाझामध्ये 11 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलमध्ये या युद्धामुळे आतापर्यंत 1,200 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, अरब देश अमेरिकेपासून दूर जात असल्याची बातमी आहे. गाझामधून हमासचा खात्मा केल्यानंतर पॅलेस्टिनी प्राधिकरणाने गाझाचे प्रशासन हाती घ्यावे, अशी अरब देशांची इच्छा आहे, परंतु इस्रायल तसे करण्यास तयार नाही. पॅलेस्टिनी प्राधिकरणाने येथील सत्ता ताब्यात घेतल्यास हमास येथे पुन्हा ताबा घेईल, असे त्यांना वाटते.









