वृत्तसंस्था/ जेरुसलेम
गाझामध्ये इस्रायलने पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. इस्रायलने गाझातील हॉस्पिटलवर हल्ला केल्याने 17 जणांना प्राणास मुकावे लागले. उत्तर गाझामधील या हल्ल्यातील मृतांमध्ये 9 महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. गाझा शहरातील अल-अहली रुग्णालयाचे संचालक डॉ. फादेल नइम यांनी हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या हल्ल्यानंतर इमारतीचा काही भाग उद्ध्वस्त झाला असून बचावाचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. इस्रायली लष्कराकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. इस्रायली सैन्याने गेल्या महिनाभरापासून जबलिया आणि आसपासच्या बीट लाहिया आणि बीट हॅनौन शहरांना वेढा घातला आहे. या चालीमुळे या भागात वास्तव्य करणारे हजारो लोक जवळच्या गाझा शहराकडे पळून गेले आहेत.









