वृत्तसंस्था/ साना
इराण समर्थित हुथी बंडखोरांनी केलेल्या हवाई हल्ल्यांना इस्रायलने तीव्र प्रत्युत्तर देत येमेनची राजधानी साना येथे हवाई हल्ले केले. रविवारी सानाच्या निवासी भागात मोठे स्फोट झाल्यामुळे संपूर्ण शहर हादरले. या इस्रायली हल्ल्यांमध्ये हेझियाज पॉवर प्लांट आणि गॅस स्टेशनसह अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा हुथी मीडिया ऑफिसने केला. तथापि, इस्रायलने अद्याप या हल्ल्यांना अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.
या हल्ल्यांमध्ये किमान दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाचहून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटांचा आवाज इतका मोठा होता की ते संपूर्ण शहरात ऐकू येत होते, असे सानाच्या रहिवाशांनी सांगितले. राष्ट्रपती राजवाडा आणि बंद लष्करी अकादमीजवळही स्फोट झाले.









