दोन भुयार अन् शस्त्रास्त्र प्रकल्प नष्ट ः 2006 नंतरचा सर्वात मोठा हल्ला
वृत्तसंस्था/ जेरूसलेम
इस्रायलने शुक्रवारी पहाटे गाझापट्टीवर एअरस्ट्राइक केला आहे. इस्रायलच्या डिफेन्स फोर्सने हवाईहल्ल्यात दोन भुयार अन् शस्त्रास्त्र निर्मिती प्रकल्पांना नष्ट केल्याचा दावा केला आहे. इस्रायलने या सैन्यमोहिमेला ‘द स्ट्राँग हँड’ नाव दिले आहे.
एअरस्ट्राइकच्या प्रत्युत्तरानंतर गाझामधून दहशतवाद्यांनी इस्रायलच्या दिशेने रॉकेट्स डागल्याने दक्षिण इस्रायलमध्ये एअर रेड सायरन वाजू लागला होता. दहशतवाद्यांकडून 2006 नंतरचा सर्वात मोठा रॉकेट हल्ला करण्यात आल्याचे म्हणत इस्रायलने याकरता पॅलेस्टिनी ग्रूप हमासला जबाबदार ठरविले आहे.
लेबनॉनमधून रॉकेट्स डागण्यात आल्यावर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल कारवाई केली आहे. दक्षिण लेबनॉनमधून झालेल्या हल्ल्यात 34 हून अधिक रॉकेट्सच्या इस्रायलच्या दिशेने डागण्यात आली होती. या हल्ल्यांमध्ये दोन जण जखमी झाले होते. तर अनेक इमारती अन् वाहनांचे नुकसान झाले आहे.
शत्रूला किंमत मोजावी लागणार
इस्रायलवर रॉकेट हल्ले झाल्यावर पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी सुरक्षाविषयक बैठक घेतली. आम्ही शत्रूवर हल्ला करू आणि त्यांना आमच्यावरील प्रत्येक हल्ल्याची किंमत मोजावी लागणार आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून धोक्याच्या स्थितीत पूर्ण इस्रायल एक राहणार असल्याचे नेतान्याहू यांनी बैठकीत म्हटले आहे.
इस्रायल पोलिसांच्या कारवाईची पार्श्वभूमी
इस्रायलच्या पोलिसांनी बुधवारी जेरूसलेम येथील अल-अक्सा मशीद परिसरात कारवाई केली होती. काही पॅलेस्टिनी उग्रवाद्यांवर कारवाई करण्यासाठी मशीद परिसरात शिरावे लागले होते. यादरम्यान समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. या झटापटीत एका पोलिसासह 14 जण जखमी झाले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे.









