पुढची योजना सज्ज, हल्ले तात्पुरते थांबवण्यास मान्यता : गाझा शहरावर लवकरच नियंत्रण
वृत्तसंस्था / तेल अवीव
इस्रायलच्या सैन्याने गाझा पट्टी आपल्या नियंत्रणात घेण्यासाठी सज्जता केली आहे. हमास ही दहशतवादी संघटना इस्रायलच्या धडाक्यामुळे आता बचावात्मक पवित्र्यात आली असून तिचा सर्वनाश झाल्यानंतरच हे युद्ध थांबेल, याचा पुनरुच्चार इस्रायलने केला आहे. तसेच युद्ध थांबल्यानंतर गाझा पट्टीच्या सर्वंकष संरक्षणाचे उत्तरदायित्व घेण्यासही इस्रायलने मान्यता दिली आहे.
मधल्या काळात, गाझावासियांना अन्न आणि औषधे पुरविता यावीत म्हणून काहीकाळापुरते हल्ले थांबविण्यास त्या देशाने मान्यता दिली आहे. मात्र, हा निर्णय केवळ मानवतेच्या दृष्टीकोनातून घेण्यात आला असून ही शस्त्रसंधी नव्हे, असेही इस्रायलने स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे युद्ध प्रदीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या पाणबुडीचे आगमन
अमेरिकेने यापूर्वीच आपल्या दोन विमानवाहू नौका भूमध्य समुद्रात आणल्या आहेत. तसेच सोमवारी अणुशक्तीवर चालणारी एक पाणबुडीही पर्शियाच्या आखातात आणण्यात आली आहे. इराणवर दबाव आणण्यासाठी ही पाणबुडी आणण्यात आल्याचे तज्ञांचे मत आहे. इस्रायलला इराणने धमकी दिली आहे.
युद्धाला एक महिना पूर्ण
7 ऑक्टोबरला हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर निर्घृण हल्ला केल्याने या युद्धाचा प्रारंभ झाला होता. आता या युद्धाला एक महिना पूर्ण झाला आहे. या कालावधीत इस्रायलने हमासचा शक्तिपात करण्यात यश मिळविले आहे. तसेच गाझा पट्टीवर पुन्हा नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने गाझाचे उत्तर आणि दक्षिण असे दोन तुकडे इस्रायलकडून करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
10,000 हून अधिक ठार
गेल्या एक महिन्यात इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये गाझा पट्टीत 10,000 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मृतांमध्ये 4 हजारांहून अधिक बालके आणि 2 हजारांहून अधिक महिलांचा समावेश आहे. इस्रायलच्या भूमीवरील कारवाईत हमासचे 14 कमांडर्स ठार झाले असून असंख्य दहशतवादीही ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. इस्रायलच्या 23 सैनिकांना आतापर्यंत हौतात्म्य प्राप्त झाल्याचे त्या देशाच्या सैनिक प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.
सुरक्षा परिषदेत पुन्हा मतभेद
सुरक्षा परिषदेत सोमवारी पुन्हा या युद्धावरुन मतभेद निर्माण झाल्याचे दिसून आले. या युद्धावर परिषदेच्या बैठकीत दोन तास बंद दरवाजाआड जोरदार चर्चा झाली. अमेरिकेने मानवीय सहाय्यता पोहचविण्यासाठी तात्पुरत्या युद्धबंदीचा मुद्दा लावून धरला. तर सुरक्षा परिषदेच्या इतर काही सदस्यांनी शस्त्रसंधीचा आग्रह धरला होता, अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे कोणताही प्रस्ताव संमत होऊ शकला नाही. इस्रायलने केवळ काही काळापुरता युद्धविराम करावा आणि नंतर पुन्हा आपली कारवाई पुढे न्यावी, अशी अमेरिकेची भूमिका असून ती इस्रायलने मान्य केली आहे. मात्र, तात्पुरता युद्धविराम केव्हा होणार हे स्पष्ट झालेले नाही.
वली आफसा ठार
इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हमासच्या क्षेपणास्त्र विभागाचा कमांडर वली अफसा ठार झाल्याचे वृत्त आहे. हा हमाससाठी मोठाच धक्का मानला जात आहे. इस्रायलने गाझा पट्टीत मोठ्या प्रमाणावर भूसैनिक कारवाईस प्रारंभ केला असून हमासच्या साडेतीन हजारांहून अधिक स्थानांवर मारा करुन ती उद्ध्वस्त केली आहेत. त्याचप्रमाणे उत्तर गाझातील 200 हून अधिक भुयारेही उद्ध्वस्त झाल्याने दहशतवाद्यांच्या लपण्याच्या जागा नष्ट झाल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली.
हल्ले सुरुच ठेवणार
हमासवरील हल्ले इस्रायलकडून सुरुच राहणार आहेत. उत्तर गाझामध्ये सोमवारी इस्रायली विमानांनी हमासच्या अनेक स्थानांना लक्ष्य केले. अनेक इमारती उद्ध्वस्त केल्या. तसेच उत्तर गाझामधून दक्षिण गाझात जाण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांकरिता एक मार्गही मोकळा केला. आतापर्यंत उत्तर गाझामधून दक्षिण गाझात 70 टक्के पॅलेस्टीनींचे स्थलांतर झाल्याचे प्रतिपादन इस्रायलने केले आहे.
युद्ध आघाडीवर दिवसभरात…
ड अमेरिकेचे विदेश मंत्री ब्लिंकन यांची विविध राष्ट्रप्रमुखांशी चर्चा
ड केवळ तात्पुरत्या युद्धविरामास इस्रायल तयार, हमासला संपवणार
ड लेबेनॉनमधील हिजबुल्लावरही इस्रायलचे हल्ले, दहशतवादी ठार
ड हमासची गाझा पट्टीतील अनेक भुयारे इस्रायल सेनेकडून उद्ध्वस्त









