सैनिकांना दिले अधिक प्रदेश घेण्याचे स्पष्ट आदेश
वृत्तसंस्था / जेरुसलेम
हमासने लवकरात लवकर ओलीसांची सुटका केली नाही, तर गाझा पट्टीचा काही भाग ताब्यात घेतला जाईल, असा इशारा इस्रालयने दिला आहे. आपल्या सैनिकांना इस्रायलने गाझा पट्टीत पुढे जाण्याचा आदेश दिला असून शक्य तितका भाग आपल्या अधिकारात आणण्याच्या सूचना केल्या आहेत.
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कात्झ यांनी आपल्या सैनिकांना स्पष्ट आदेश दिला आहे. गाझा पट्टीमध्ये अधिक पुढे कूच करा. या प्रदेशाचा जास्तीत जास्त भाग आपल्या कार्यकक्षेत आणा, असा संदेश त्यांनी सैनिकांना पाठविला आहे. हमास ओलीसांना सोडण्यास जितका अधिक वेळ लावेल, तितका गाझाचा अधिक भाग हमासला गमवावा लागेल, अशा शब्दांमध्ये त्यांनी हमासलाही खडसावले आहे.
सैनिकांचा प्रवेश
गाझा पट्टीत इस्रायली सैनिकांनी पुन्हा प्रवेश केला आहे. गेले तीन दिवस या देशाने गाझापट्टीवर पुन्हा वायुहल्ले केले असून या हल्ल्यांमध्ये 190 मुलांसह 500 हून अधिक लोकांचा बळी गेल्याचा दावा हमासने केला आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये इस्रायल हल्ल्यांची तीव्रता वाढविण्याची शक्यता आहे. गाझा पट्टीत इस्रायली सैनिकांनी पुढे मुसंडी मारल्यास आणि गाझा पट्टीच्या आणखी काही भागाचा ताबा घेतल्यास हमासची मोठी हानी होणार आहे. या सर्व घडामोडींमुळे गेले दीड वर्ष चाललेला हा संघर्ष वेगळ्या वळणावर जाईल अशी चिन्हे दिसत आहेत.









