वृत्तसंस्था/जेरूसलेम
वेस्ट बँकेच्या एका गावातून इस्रायलच्या सैन्याने भारताच्या 10 कामगारांना दहशतवाद्यांच्या तावडीतून वाचविले आहे. या भारतीयांना एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून ओलीस ठेवण्यात आले होते. पॅलेस्टिनी लोकांनी कामाचे आश्वासन देत या भारतीयांना वेस्ट बँकेच्या अल-जायम गावात बोलाविले आणि मग त्यांचे पासपोर्ट काढून घेण्यात आले आणि त्यांचा वापर करत इस्रायलमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. हे भारतीय इस्रायलच्या उद्योगक्षेत्रात काम करण्यासाठी आले होते. या भारतीयांना पॅलेस्टिनी दहशतवाद्यांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी इस्रायलच्या सैन्याने कारवाई केली आहे. या भारतीयांची रोजगार स्थिती जोपर्यंत निर्धारित केली जात नाही तोवर त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यातत आल्याचे इस्रायलच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
भारतीयांना त्यांचे पासपोर्ट परत मिळवून देण्यात आले आहेत. पॅलेस्टिनींनी भारतीय पासपोर्टचा वापर करत सहजपणे इस्रायलमधील काही चेकपॉइंट ओलांडले होते. परंतु एका चेकपॉइंटवर इस्रायलच्या सैनिकांना संशय वाटल्याने पॅलेस्टिनींना रोखण्यात आल्यावर गुन्ह्याचा खुलासा झाला होता. पॅलेस्टिनींकडून पासपोर्ट जप्त करत इस्रायलच्या सैन्याने भारतीय नागरिकांची मुक्तता करविली आहे.
मागील एक वर्षात भारतातून सुमारे 16 हजार कामगार बांधकाम क्षेत्रात काम करण्यासाठी इस्रायलमध्ये पोहोचले आहेत. भारतीय कामगारांना इस्रायलमध्ये आणण्याचा उद्देश पॅलेस्टिनी कामगारांची जागा त्यांनी घ्यावी असा आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने पॅलेस्टिनी लोकांच्या वर्क परमिटला स्थगिती दिली आहे. संघर्षविरामादरम्यान इस्रायली ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या हल्ल्यात गाझाच्या रफामध्ये दोन पॅलेस्टिनी मारले गेल आहेत. तर खान यूनिसमध्ये हेलिकॉप्टरने करण्यात आलेल्या गोळीबारात तीन जण जखमी झाले आहेत. इस्रायलकडून कठोर धोरण राबविण्यात येत असल्याने संघर्षविराम संपुष्टात येऊ शकतो अशी भीती आता पॅलेस्टिनींमध्ये निर्माण झाली आहे.









