ट्रम्प यांनी मध्यपूर्वेतील कर्मचाऱ्यांना परत बोलाविले : इराणला अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखण्याचे वक्तव्य
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
इराणवर हल्ला करण्यासाठी इस्रायल पूर्णपणे तयार असून त्याने याविषयी अमेरिकेला कळविले असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांचा दाखला देत सीबीएस न्यूजने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. इस्रायलने हल्ला केल्यास इराण सूडापोटी इराकमधील अमेरिकेच्या तळांना लक्ष्य करू शकतो अशी भीती आता अमेरिकेला सतावत आहे. याचमुळे अमेरिकेने मध्यपूर्वेतील अमेरिकेचे नागरिक आणि अधिकाऱ्यांना मायदेशी आणण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या विदेश विभागाने इराकमध्ये तैनात अनावश्यक सरकारी अधिकाऱ्यांना परतण्याचा आदेश दिला आहे. याचदरम्यान मध्यपूर्वेतील ट्रम्प यांचे प्रतिनिधी स्टीव विटकॉफ अद्याप इराणसोबत आण्विक कार्यक्रमावर चर्चेच्या 6 व्या फेरीसाठी तयारी करत आहेत. ही चर्चा आगामी काही दिवसांमध्ये होणार आहे.
स्थिती बिघडण्याची शक्यता : ट्रम्प
मध्यपूर्वेतील काही देशांमधील सैनिक माघारी बोलाविण्यात येत आहेत, कारण तेथील स्थिती धोकादायक ठरू शकते असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराणला अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखले जाणार आहे. इराणच्या हातात अण्वस्त्रs जाऊ दिली जाणार नाही असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी अमेरिकेचे विदेश मंत्रालय आणि सैन्याने मध्यपूर्वेतील अनावश्यक मनुष्यबळ आणि त्यांच्या परिवाराला मायदेशी आणले जाणार असल्याचे स्पष्ट करत कुठल्याही मोठ्या संकटाच्या स्थितीत नुकसान टाळले जाणार असल्याचे नमूद केले होते.
आण्विक कार्यक्रमाला विरोध केल्यास प्रत्युत्तर
इराणच्या आण्विक कार्यक्रमाच्या विरोधात कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव युरोपीय देशांनी संमत केल्यास कठोर प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचा इशारा इराणचे विदेशमंत्री अब्बास अराघची यांनी दिला आहे. आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा संस्थेची (आयएईए) चालू महिन्यात होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. जेसीपीओए (2015 चा आण्विक करार) लागू करण्यास ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्सला 7 वर्षे मिळाली होती, परंतु या देशांनी काहीच केले नाही. हे देश जाणूनबुजून किंवा स्वत:च्या त्रुटींमुळे करार लागू करण्यास अपयशी ठरले आहेत. हेच देश आता इराणवर कारवाईची मागणी करत आहेत, तर आम्ही तर केवळ स्वत:च्या अधिकारांचा वापर केला आहे. इराण विरोधात कुठल्याही अन्यायकारक आणि आधारहीन प्रस्ताव संमत करण्यात आल्यास याचे परिणाम युरोपला भोगावे लागतील असे अराघची यांनी म्हटले आहे.
आण्विक वादाचे स्वरुप
अमेरिका आणि इस्रायल सातत्याने इराणच्या आण्विक कार्यक्रमावरून कठोर भूमिका घेऊन आहेत. इराण अनेक वर्षांपासून आण्विक तंत्रज्ञानावर काम करत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर केवळ वीजनिर्मिती आणि वैद्यकीय क्षेत्रात करत असल्याचा इराणचा दावा आहे. तर इराण गुप्तपणे अण्वस्त्र निर्मिती करू पाहत असल्याचा संशय अमेरिका आणि इस्रायलला आहे. इराणने अण्वस्त्र निर्मिती केल्यास आखाती देश, इस्रायल आणि अमेरिकेच्या तळांना मोठा धोका निर्माण होणार आहे. याचमुळे अमेरिका इराणला कुठल्याहीस्थितीत अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखू पाहत आहे.









