वृत्तसंस्था / तेल अवीव
गाझा शहर आणि गाझा पट्टीवर मोठा हल्ला करण्यासाठी इस्रायल सज्ज होत आहे. त्याने आपल्या 60 हजार राखीव सैनिकांना सज्ज राहण्याचा आदेश दिला आहे. संपूर्ण गाझा शहर आपल्या ताब्यात घेण्याची या देशाची योजना असून सध्या 50 टक्क्यांहून अधिक शहरावर त्याचा अधिपत्य आहे. पॅलेस्टाईनशी शस्त्रसंधी करण्यापूर्वी गाझाचा जास्तीत जास्त भाग आपल्या आधीन करणे ही इस्रायलची योजना असून ती येत्या काही दिवसांमध्येच क्रियान्वित केली जाणार आहे.
झेईटाऊन आणि जाबलिया भागात इस्रायलच्या सैनिक अभ्यासाला प्रारंभ झाला आहे. राखीव सैनिकांना सप्टेबरपर्यंत सेवेत समाविष्ट होण्याचा आदेश देण्यात आला आहे. इस्रायलच्या या योजनेला त्या देशाचे संरक्षणमंत्री इस्रायल कात्झ यांनी मान्यता दिल्यामुळे ही योजना आता साकारली जाणार आहे. आरंभीच्या काळात त्यांनी या योजनेला मान्यता दिली नव्हती. मात्र, आता ते राजी झाले आहेत.
नागरीकांना आदेश देणार
गाझा शहर पूर्णपणे स्वत:कडे घेण्यासाठी इस्रायलच्या हालचाली वेगाने होत असून या शहरातील हजारो पॅलेस्टाईन नागरीकांना शहर सोडून जाण्याचा आदेश लवकरच देण्यात येणार आहे. या नागरीकांनी दक्षिण दिशेकडे प्रयाण करावे आणि गाझा शहर सोडावे. तरच त्यांच्या सुरक्षिततेची हमी दिली जाऊ शकते, असे इस्रायलचे प्रतिपादन आहे. या शहरात दहा लाखांहून अधिक नागरीक आहेत.
मित्रदेशांची नाराजी
इस्रायलच्या मित्रदेशांनी इस्रायलच्या योजनेवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अनेक बिगर सरकारी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थानीही ही योजना धोकादायक असल्याचे प्रतिपादन केले आहे. गाझा शहर रिकामे केल्यास मोठ्या प्रमाणात स्थलांतर होणार असून मानवतेचा प्रश्न उभा राहणार आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात गेले 22 महिने युद्ध होत आहे. आतापर्यंत या युद्धात 70 हजारांहून अधिक जण ठार झाले आहेत. विभागीय मध्यस्थ देशांनी शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. मात्र, ते आतापर्यंत अयशस्वी झाले आहेत.
सप्टेंबरात आक्रमण होणार
इस्रायलने ज्या प्रकारे सज्जता केली आहे, ती पाहता येत्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये, अर्थात सप्टेंबरच्या प्रारंभी गाझा पट्टीवर तो देश आक्रमण करणार हे स्पष्ट झाले आहे. गाझा शहर हे इस्रायलसाठी अत्यंत महत्वाचे आहे. कारण ते गाझा पट्टीच्या मध्यभागी आहे. हे शहर हाती आल्यास गाझा पट्टीच्या संपूर्ण उत्तर भागावर इस्रायलचे वर्चस्व राहू शकते. तसेच, दक्षिण भागावरही तो देश नियंत्रण ठेवू शकतो. हे शहर हा हमास या दहशतवादी संघटनेचे महत्वाचे केंद्र आहे. ते सध्याही बव्हंशी इस्रायलच्या हाती आहे. तथापि, त्यावर अधिकृत नियंत्रण आणण्याच्या दिशेने इस्रायलच्या हालचाली होत आहेत, अशी माहिती आहे.
आणखी 20 हजारांना नोटीसा
इस्रायलने 60 हजार राखीव सैनिकांना सेवेवर येण्याचा आदेश दिला आहे. तसेच आणखी 20 हजार राखीव सैनिकांनाही लवकरच नोटीसा पाठविण्यात येणार आहेत. लवकरात लवकर गाझा पट्टीवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा इस्रायलचा उद्देश असून तो साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि सैनिक यांची योजना केली जात आहे, अशी माहिती इस्रायलच्या सूत्रांनी दिली आहे.









