वृत्तसंस्था/तेलअवीव
इस्रायलने इराण पुरस्कृत हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेच्या आस्थापनांवर दक्षिण लेबेनॉनमध्ये जोरदार वायुहल्ला चढविला आहे. या हल्ल्यापूर्वी इस्रायलने या भागातील नागरीकांना अन्यत्र जाण्याची सूचना केली होती. ही सूचना केल्यानंतर इस्रायलच्या अनेक युद्ध विमानांनी या संघटनेच्या इमारती आणि शस्त्रसाठे यांच्यावर प्रचंड बाँबफेक केली. गुरुवारी चार तासांपेक्षा अधिक काळ हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात हिजबुल्लाची मोठी हानी झाल्याची माहिती देण्यात आली.
या हल्ल्यात विशेषत्वाने हिजबुल्लाच्या लष्करी आस्थापनांना लक्ष्य बनविण्यात आले होते. दक्षिण लेबेनॉनमधील तायबेहृ तियर देब्बा आणि ऐता अल जाबाल या तीन खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हिजबुल्लाचे शस्त्रसाठे आहेत, अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर हा हल्ला करण्यात आला. या भागात शस्त्रसाठे करुन इस्रायलवर हल्ला करण्याची या संघटनेची योजना होती, असे इस्रायलचे म्हणणे आहे. ही योजना मुळापासून उखडण्यासाठी हे हल्ले करण्यात आले आहेत.
चर्चेचा इन्कार
इस्रायल आणि लेबेनॉन यांच्यात शांतता चर्चा होणार असे वृत्त मध्यंतरीच्या काळात प्रसारित करण्यात आले होते. दोन्ही देशांच्या प्रशासनांनी या चर्चेसाठी सज्जता करण्यास प्रारंभही केला होता. तथापि, हिजबुल्लाला इस्रायलशी कोणत्याही प्रकारची चर्चा अमान्य आहे. त्यामुळे या संघटनेने लेबेनॉनच्या प्रशासनावर चर्चा न करण्यासाठी दबाव आणला आहे. त्यामुळे इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात पुन्हा वाद निर्माण झाला असून इस्रायलवर हल्ला करण्याच्या तयारीत ही संघटना होती. म्हणून तिचे खच्चीकरण करण्यासाठी हा हल्ला केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.









