कतार अन् अमेरिकेच्या मध्यस्थीला यश : कराराच्या अंमलबजावणीसाठी इस्रायल मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक
वृत्तसंस्था/दोहा
इस्रायल आणि हमास यांच्यात 15 महिन्यांपासून गाझामध्ये सुरू असलेले युद्ध संपुष्टात आणणे आणि इस्रायली ओलिसांच्या मुक्ततेसाठी संघर्षविराम करार झाल्याची घोषणा कतारच्या पंतप्रधानांनी केली आहे. शेखर मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल सानी यांनी कतारची राजधानी दोहा येथे कराराची घोषणा करत संघर्ष विराम करार रविवारपासून लागू होणार असल्याचे म्हटले आहे. या कराराचे यश इस्रायल अणि हमासवर निर्भर आहे, हा करार मोडीत निघू नये म्हणून इस्रायल आणि हमासने खबरदारी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. परंतु नव्या घडामोडींमध्ये हमास अटींपासून मागे हटत असल्याचे म्हणत इस्रायलच्या पंतप्रधानांनी करार मोडीत निघण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी जोपर्यंत इस्रायल आणि हमास दीर्घकालीन युद्धविरामासाठी चर्चेच्या टेबलवर कायम राहतील, तोपर्यंत युद्धविराम लागू राहणार असल्याचे म्हटले. बिडेन यांनी या कराराला यशस्वी करण्यासाठी महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिकन कूटनीतिक प्रयत्नांना श्रेय दिले. तसेच डोनाल्ड ट्रम्प आणि माझे प्रशासन या संघर्षविरामासाठी एक सुरात बोलत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
करार अद्याप पूर्ण नाही : नेतान्याहू
तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने युद्धविराम करार अद्याप पूर्ण झालेला नसून अंतिम तपशीलावर काम केले जात असल्याचा दावा केला आहे. कराराच्या तपशीलाला लवकरच अंतिम स्वरुप दिले जाणार असल्याचे नेतान्याहू यांच्या कार्यालयाने नमूद केले आहे. तर हमास अंतिम क्षणी सवलती पदरात पाडून घेण्यासाठी कराराच्या काही हिस्स्यांमधून मागे हटल्याचा आरोप नेतान्याहू यांनी केला आहे.
पॅलेस्टिनी कैद्यांची यादी
इस्रायलमध्ये घातक हल्ले केल्याप्रकरणी दीर्घ शिक्षा भोगत असलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांची यादी तयार केली जात आहे. कराराच्या अंतर्गत या कैद्यांची मुक्तता केली जाणार आहे. कुठल्याही करारासाठी नेतान्याहू यांना मंत्रिमंडळाची मंजुरी मिळविणे आवश्यक आहे. या कराराच्या अंतर्गत युद्ध पहिल्या 6 आठवड्यांसाठी रोखले जाणे अपेक्षित आहे, त्याचबरोबर युद्ध पूर्णपणे समाप्त करण्यावर चर्चा सुरू होणार आहे.
योग्य पाऊल : इस्रायलचे राष्ट्रपती
इस्रायलचे राष्ट्रपती इसहाक हर्जोग यांनी हमाससोबत घोषित युद्धविराम आणि ओलीस मुक्तता कराराला सर्व इस्रायलींना घरी परत आणण्यासाठी योग्य पाऊल ठरविले आहे. हे एक महत्त्वपूर्ण अन् आवश्यक पाऊल आहे. आमच्या मुलामुलींना आमच्याकडे परत आणण्याहून मोठे कुठलेही नैतिक, मानवीय, ज्यू किंवा इस्रायली कर्तव्य नसल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.
भारताने केले स्वागत
इस्रायल-हमास यांच्यात झालेल्या युद्धविराम कराराचे भारताने स्वागत केले आहे. भारताच्या विदेश मंत्रालयाने करारानंतर गाझामध्ये शांतता आणि मानवी सहाय्य वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ओलिसांची मुक्तता आणि गाझामध्ये युद्धविरामासाठी कराराच्या घोषणेचे आम्ही स्वागत करतो. या करारामुळे गाझाच्या लोकांना मानवी सहाय्याची सुरक्षित आणि निरंतर पुरवठा होणार आहे. आम्ही सातत्याने सर्व ओलिसांची मुक्तता, युद्धविराम, चर्चा आणि कूटनीतिच्या मार्गावर परतण्याचे आवाहन पेले असल्याचे भारतीय विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.









