हवाई हल्ल्यात हमासचा कमांडर ठार
वृत्तसंस्था/ गाझापट्टी
गाझावर इस्रायलचा कब्जा आता जवळपास निश्चित मानला जात आहे. हमासच्या विरोधात पुकारलेल्या युद्धात इस्रायलचे सैन्य सातत्याने पुढे सरकत आहे. याचदरम्यान दक्षिण गाझामध्ये हमासचा वरिष्ठ कमांडर नासर मूसाला ठार केल्यावरही आयडीएफने स्वत:चे हल्ले सुरूच ठेवले आहेत. इस्रायलने केलेल्या नव्या हवाई हल्ल्यात 37 जण मारले गेले असून मृतांमध्ये अनेक महिला आणि मुलांचा समावेश आहे.
इस्रायलच्या लढाऊ विमानांनी राफा ब्रिगेडचा महत्त्वाचा दहशतवादी नासर मूसाला हवाई हल्ल्यात ठार केले. मूसा हा हमासच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण द्यायचा आणि इस्रायलमध्ये झालेल्या अनेक हल्ल्यांचा तो सूत्रधारही होता. याचबरोबर इस्रायली सैन्याने खान यूनिसमधील रॉकेट्सचा साठा असलेल्या इमारतीला लक्ष्य केले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी स्वत:च्या सैन्याला गाझापट्टीवर कब्जा करण्याची पूर्ण सूट दिली आहे. हे युद्ध लवकर संपविले जाईल आणि ओलिसांना कुठल्याही स्थितीत मुक्त करण्यात येईल असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे. तर जगातील अनेक देश इस्रायलच्या या कारवाईला विरोध करत आहेत.
सद्यकाळात गाझामधील स्थिती अत्यंत भयावह आहे. मागील 2 वर्षांमध्ये 61,827 पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. तर 1,55,275 लोक गंभीर जखमी झाले आहेत. तर इस्रायलमध्ये ओलिसांच्या मुक्ततेची मागणी तीव्र होऊ लागली आहे. तेल अवीवच्या रस्त्यांवर हजारो लोक पोस्ट अन् बॅनर घेऊन उतरले आहेत. या लोकांनी ओलिसांची सुरक्षित वापसी करविण्याचे आवाहन सरकारला केले आहे.








