वृत्तसंस्था / तेल अवीव
इस्रायलने अचानकपणे सीरियाच्या लष्करी मुख्यालयावर जोरदार हल्ला केला आहे. या हल्ल्यात या मुख्यालयाची मोठी हानी झाल्याचे वृत्त आहे. तसेच अनेक जण मुख्यालय इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले असून त्यांना वेळेवर बाहेर काढण्यात आले नाही, तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याचा संभव व्यक्त केला जात आहे. बऱ्याच दिवसांच्या नंतर इस्रायलने सीरियाला लक्ष्य केले आहे.
इस्रायलच्या सेना कार्यालयाने या हल्ल्याची माहिती प्रसिद्ध केली. हा हल्ला बुधवारी दुपारच्या वेळेत करण्यात आला. अत्याधुनिक विमाने आणि क्षेपणास्त्रांचा उपयोग करण्यात आला. निरपराध नागरिकांची जीवितहानी कमीत कमी व्हावी, याचा प्रयत्न या हल्ल्यात करण्यात आला. सीरियाचे प्रमुख लष्करी अधिकारी आणि नेते यांना लक्ष्य करण्यात आले. हल्ला यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला.
अल्पसंख्य समाजाला वाचविण्यासाठी…
सीरियात वास्तव्या असलेल्या ड्रूझे या अल्पसंख्याक समाजाचे संरक्षण करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता. मुख्य उद्देश या समाजाच्या मनात आत्मविश्वास जागृत करण्याचा होता. हा समाज 10 व्या शतकापासून अस्तित्वात आहे. तो शिया इस्लामचा एक पंथ मानला जातो. जगभरात या समाजाचे 10 लाखांहून अधिक अनुयायी आहेत. त्यांच्यापैकी 5 लाखांहून अधिक सिरीयात वास्तव्यास आहेत. लेबेनॉन आणि इस्रायलमध्येही हा समाज मोठ्या संख्येने आहे. इस्रायलने सीरियाकडून 1967 च्या युद्धात गोलान टेकड्यांचा सामरिकदृष्ट्या महत्वाचा प्रदेश जिंकून घेतला होता. आताही या प्रदेशावर त्याचे नियंत्रण आहे. या प्रदेशातही ड्रूझे समाजाची संख्या लक्षणीय आहे. या समाजाला इस्लामच्या सुन्नी या पंथाकडून नेहमी लक्ष्य केले जाते. त्यामुळे त्याला संरक्षण देणे ही इस्रायल आपले उत्तरदायित्व मानतो, अशी माहिती इस्रायलकडून देण्यात आली.
काही भाग ड्रूझांच्या ताब्यात
ड्रूझ लोकांनी आपल्या संरक्षणासाठी सीरियाच्या काही भागांवर नियंत्रण मिळविले आहे. त्यामुळे सीरियाच्या नव्या सुन्नी प्रशासनाने ड्रूझ स्वातंत्र्यप्रेमी बंडखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी या भागात सैन्य नियुक्त पेले होते. या सैन्याच्या तळांवरही इस्रायलने हल्ला केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या रविवारी ड्रूझ बंडखोर आणि सीरियाचे सैन्य यांच्यात जोरदार चकमकी उडाल्या. तसेच या भागातील सुन्नी मुस्लीम बदायूं जमाती आणि ड्रूझ बंडखोर यांच्यातही हिंसक चकमकी होत आहेत. या चकमकींमध्ये 100 हून अधिकांचा मृत्यू झाला असून ड्रूझ बंडखोरांना इस्रायलचे साहाय्य असल्याचा आरोप सीरियाच्या प्रशासनाने केला आहे.









