वृत्तसंस्था/ सना
हुथी बंडखोरांच्या नियंत्रणाखाली असलेल्या येमेनच्या रास अल-इस्सा बंदरावर इस्रायली ड्रोनने एलपीजीवाहू जहाजावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे जहाजातील एका एलपीजी टँकमध्ये स्फोट झाला आणि आग लागली. कर्मचाऱ्यांनी त्वरित कारवाई करत आग विझवली. तथापि, हुथी बंडखोर बोटींनी टँकरला वेढा घालत कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले. दीर्घ प्रयत्नांनंतर जहाज आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना हुथींनी सोडले. हल्ला करण्यात आलेले जहाज इराणच्या बंदर अब्बास बंदरातून निघाले होते. या जहाजामध्ये 24 पाकिस्तानी, दोन श्रीलंकन आणि एक नेपाळी असे 27 क्रू मेंबर्स होते. जहाजाचा कॅप्टन मुक्तार अकबर देखील पाकिस्तानी असल्याचे स्पष्ट झाले आहे. एलपीजीवाहू जहाजामध्ये असलेले 24 पाकिस्तानी नागरिक सुरक्षित असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी सकाळी सांगितले.









