इराणचा अणुशास्त्रज्ञ ठार, आण्विक आस्थापने लक्ष्य
वृत्तसंस्था/ तेल अवीव, तेहरान
इस्रायलने पुन्हा एकदा इराणवर जोरदार वायुहल्ला चढविला आहे. या हल्ल्यात इराणच्या अनेक सैनिकी आणि अणुतळांना लक्ष्य करण्यात आले आहे. इस्रायलच्या बॉम्बफेकीत इराणच्या आणखी एका अणुशास्त्रज्ञाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अशाप्रकारे गेल्या आठ दिवसांमध्ये इराणचे 15 ज्येष्ठ शास्त्रज्ञ ठार झाले आहेत.
शुक्रवारी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात 50 ते 60 युद्धविमानांचा उपयोग करण्यात आला होता. या विमानांनी अचूक बॉम्बफेक करत इराणच्या चार प्रांतांमधील अणुतळांवर हल्ले चढविण्यात आले आहेत. दोन अणुप्रक्रिया तळांची मोठी हानी झाल्याचे वृत्त आहे. गुरुवारी इराणने इस्रायलच्या एका रुग्णालयावर हल्ला केला होता. या हल्ल्याची पूर्व कल्पना असल्याने गंभीर अवस्थेतील रुग्णांना इस्रायलने रुग्णालयाच्या तळघरात हलविले होते. त्यामुळे फारशी हानी झाली नाही.
अमेरिकेशी चर्चा करण्यास नकार
अमेरिकेशी अणुकार्यक्रमासंबंधी कोणतीही चर्चा करण्यात येणार नाही, अशी स्पष्टोक्ती इराणने पुन्हा केली आहे. येत्या दोन आठवड्यांमध्ये अमेरिका आपला निर्णय घेणार आहे, अशी स्पष्ट भाषा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी केली होती. त्यामुळे अमेरिकेशी चर्चा न करण्याचा आमचा निर्णय आहे, असे इराणने स्पष्ट केले आहे. तथापि, इराणचे काही उच्च पदस्थ अधिकारी अमेरिकेशी आतून चर्चा करीत आहेत. अणुसंबंधातील विषयांचे निराकरण चर्चेतूनही होईल, असा अनेकांचा विश्वास आहे. पण तशी अधिकृत भूमिका घेतली गेलेली नाही.
उलटसुलट संकेत
अमेरिकेशी चर्चा करणार नाही, असे म्हणणाऱ्या इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची यांनी चर्चेचे संकेत दिले आहेत. मुत्सद्द्यांच्या माध्यमातून आम्ही चर्चा करीत आहोत. ती पुढेही होत राहील. तथापि, आम्हाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. त्याचाच उपयोग आम्ही करीत आहोत. इस्रायलने हल्ले थांबविल्यास आम्ही चर्चा करण्यात तयार आहोत, असे प्रतिपादन अरघची यांनी शुक्रवारी केले.
इराणचा प्रतिहल्ला
इस्रायलच्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इराणनेही इस्रायलच्या काही स्थानांवर क्षेपणास्त्र हल्ला चढविल्याचे वृत्त आहे. मात्र, हे हल्ले गुरुवारच्या हल्ल्यांच्या तुलनेत सौम्य होते. तसेच ते अचूक नव्हते. त्यामुळे इस्रायलची फारशी हानी झाली नाही. आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे 700 हून अधिक बळी गेले आहेत. तर इस्रायलच्या 45 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती देण्यात आली.
भारताने दडपण आणावे…
इराण चर्चा करण्यासाठी राजी आहे. तथापि, इस्रायलने आधी हल्ले थांबवावेत. भारत हा शांतता मानणारा देश आहे. त्यामुळे भारताने पुढाकार घेतल्यास संघर्ष थांबू शकतो. भारताने इस्रायलवर तसे दडपण आणावे, असे आवाहन इराणचे भारतातील उपराजदूत मोहम्मद जवाद हुसेन यांनी केले आहे. भारत आणि इस्रायलच यांच्यातील संबंध लक्षात घेता भारत मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारु शकतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.
युरोपियन नेते अरघची यांना भेटणार
युरोपियन महासंघानेही शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करण्यास प्रारंभ केला आहे. युरोपियन महासंघाचे नेते शनिवारी इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरघची यांना भेटणार आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमासंबंधी त्यांची चर्चा होणार आहे. फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी आणि युरोपियन महासंघ यांनी शस्त्रसंधीचा प्रस्ताव पुढे केला आहे. अद्याप या प्रस्तावाला इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांनी प्रतिसाद दिलेला नाही. मात्र, येत्या काही दिवसात संघर्ष सौम्य होईल, अशीही चर्चा आहे.









