वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायलने रविवारी रात्री उशिरा गाझामधील अनेक ठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये निर्वासितांची छावणी म्हणून वापरल्या जात असलेल्या एका शाळेलाही लक्ष्य करण्यात आले. यामध्ये 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सोमवारीही सुरू राहिलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार, मृतांमध्ये रेडक्रॉसचे दोन कर्मचारी, एक पत्रकार आणि अनेक मुलांचा समावेश आहे. दुसरीकडे, स्पेनने जगभरातील देशांनी इस्रायलवर निर्बंध लादण्याची मागणी केली आहे.
इस्रायलकडून गाझामध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू करण्यात आली. याअंतर्गत, 14 ते 20 मे या कालावधीत हमासच्या 670 हून अधिक ठिकाणांवर हल्ले करण्यात आले, ज्यामध्ये गाझातील 512 लोक मारले गेले. तसेच 23 मे रोजी गाझावर झालेल्या इस्रायली हल्ल्यात खान युनूस येथील महिला डॉक्टर डॉ. अल-नज्जर यांची नऊ मुले ठार झाली, तर एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मृत मुलांचे वय 7 महिने ते 12 वर्षे होते. या हल्ल्यात डॉक्टरच्या पतीलाही गंभीर दुखापत झाली आहे.









