डोनाल्ड ट्रम्प यांची 20 कलमी योजना : नेतान्याहू यांच्याशी चर्चा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी सल्लामसलत करून विकसित केलेली गाझामधील इस्रायल-हमास युद्ध संपवण्यासाठी 20 कलमी शांतता योजना सादर केली आहे. इस्रायल आणि हमास दोघांनीही या मुद्यांशी सहमती दर्शविली तर युद्ध संपण्याची आशा आहे. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या प्रस्तावाबाबत सकारात्मकता दर्शवली असली तरी हमासकडून हा प्रस्ताव मान्य झाल्यानंतरच द्विपक्षीय संघर्ष थांबण्याची चिन्हे आहेत. जर दोन्ही बाजू सहमत झाल्या तर इस्रायली सैन्य गाझामधून माघार घेईल आणि सर्व लढाई थांबतील. इस्रायली सैन्य हळूहळू माघार घेईल, परंतु सुरुवातीला ओलिसांना सोडण्यास हमास तयार होण्याची प्रतीक्षा आहे.
इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझामध्ये युद्धबंदीला सहमती दर्शविली आहे. सोमवारी रात्री वॉशिंग्टन डीसी येथे नेतन्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. ट्रम्प यांनी 20 कलमी युद्धबंदी योजना तयार केली आहे. जर हमास या योजनेशी सहमत नसेल तर इस्रायलला ती रद्द करण्याचा अधिकार आहे आणि अमेरिका त्याला पाठिंबा देईल, असे ट्रम्प म्हणाले. तर गाझामध्ये शांततापूर्ण प्रशासन असेल. हमासची सर्व शस्त्रs काढून टाकली जातील आणि इस्रायल हळूहळू गाझामधून माघार घेईल, असे नेतान्याहू यांनी सांगितले. या योजनेचे उद्दिष्ट गाझामध्ये कायमस्वरूपी शांतता, विकास आणि लोकांचे जीवनमान सुधारणा हे असणार आहे.
ट्रम्प यांच्या योजनेचे नरेंद्र मोदींकडून स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्या युद्धबंदी योजनेचे स्वागत केले आहे. ‘ट्रम्प यांची योजना पॅलेस्टिनी आणि इस्रायली लोकांसाठी तसेच संपूर्ण पश्चिम आशियाई प्रदेशासाठी शांतता, सुरक्षा आणि विकासाचा मार्ग मोकळा करेल. ट्रम्प यांच्या पुढाकाराला सर्वजण पाठिंबा देतील आणि संघर्ष संपवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देतील अशी आशा मोदींनी व्यक्त केली.
अन्य आठ देशांकडून संयुक्त निवेदन
भारतासोबतच इजिप्त, इंडोनेशिया, जॉर्डन, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, तुर्की आणि संयुक्त अरब अमिरातीसह आठ इस्लामिक देशांनीही ट्रम्प यांच्या प्रस्तावाचे स्वागत करणारे संयुक्त निवेदन जारी केले. ट्रम्प यांच्या नेतृत्वावर आणि युद्ध संपवण्यासाठी त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांवर विश्वास असल्याचे मतप्रदर्शन या आठ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी जारी केलेल्या निवेदनात करण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या या योजनेच्या विकासादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर त्यांच्या संपर्कात आहेत.
नेतान्याहू द्विधा मनस्थितीत?
इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सुरुवातीला ट्रम्प यांच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली असली तरी काही तासांतच नेतान्याहू मागे हटताना दिसत आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत पॅलेस्टाईनला मान्यता देणार नाही आणि गाझामध्ये सैन्य ठेवले जाईल, असे नेतन्याहू यांनीच जाहीर केल्याचे समजते. नेतान्याहू यांचे विधान ट्रम्पच्या योजनेशी विसंगत असून या भूमिकेमुळे संपूर्ण योजना रुळावरून घसरू शकतात. नेतान्याहू यांनी मंगळवारी आपल्या टेलिग्राम चॅनेलवर हिब्रू भाषेत दिलेल्या निवेदनात काही मुद्दे नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.
युद्धविराम योजनेतील महत्त्वाचे मुद्दे
गाझामधील लढाई थांबवणे, सर्व ओलिसांची सुटका करणे
इस्रायल हळूहळू गाझापट्टीमधून आपले सैन्य मागे घेईल
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या काही कैद्यांना सोडणे
संघर्षात ठार झालेल्या लोकांच्या मृतदेहांची देवाण-घेवाण
गाझामधून सर्व हमास सुविधा व शस्त्रs काढून टाकणार
हमास व इतर मिलिशियाचा सरकारमध्ये सहभाग नाही
गाझासाठी एक तात्पुरती तांत्रिक समिती स्थापन करणार
गाझामधील प्रशासनासाठी तात्पुरते मंडळ स्थापन करणे
मंडळात माजी ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे नाव
मंडळ गाझाच्या विकास व सुधारणांचे नियोजन करणार
गाझाला तात्काळ आणि पुरेशी मदत देण्याचाही विचार
गाझामध्ये विशेष व्यापार क्षेत्रे स्थापून रोजगार वाढवणार
कोणालाही गाझापट्टी सोडण्यास भाग पाडले जाणार नाही
गाझामधील सुरक्षेसाठी एक आंतरराष्ट्रीय दल काम करेल
सुरक्षा दल गाझा पोलिसांना प्रशिक्षण आणि मदत करतील
इस्रायल व इजिप्तच्या सीमेवर सुरक्षा मजबूत केली जाईल
इस्रायल व पॅलेस्टाईनमध्ये शांतता वाटाघाटी सुरू होतील









