वृत्तसंस्था/ ऑकलंड
एटीपी टूरवरील येथे सुरू झालेल्या ऑकलंड खुल्या क्लासिक पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेचा माजी विजेता जॉन इस्नेर तसेच विद्यमान विजेता युगो हम्बर्ट यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.
या स्पर्धेच्या दुसऱया दिवशी अचानक वादळ निर्माण झाल्याने सर्व सामने पुढे ढकलण्यात आले. दरम्यान पहिल्या फेरीतील केवळ काही सामने खेळवले गेले. फ्रान्सच्या ग्रेगरी बॅरेरी या बिगर मानांकित टेनिसपटूने 37 वर्षीय जॉन इस्नेरचा 6-7 (3-7), 7-6(7-5), 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळवला. इस्नेरने ही स्पर्धा 2010 आणि 2014 साली जिंकली होती. या सामन्यात इस्नेरने 28 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. दुसऱया एका सामन्यात अमेरिकेच्या ख्रिस्टोफर युबँक्सने फ्रान्सच्या हम्बर्टचा 7-6(7-4), 7-6(7-3) असा पराभव करत विजयी सलामी दिली. 2020 साली हम्बर्टने ही स्पर्धा जिंकली होती.









