इस्लामपूर :
इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीत पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांच्या वरदहस्ताने अवैध धंदे सुरु असून या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओझेर्डे-घबकवाडी गावा जवळ एलसीबीला २८ किलो गांजा सापडतो. इस्लामपूर पोलीस ठाणे अवैध धंद्यांसाठी कार्यक्षेत्र व उगमस्थान बनत असल्याचा आरोप भाजपचे नेते विक्रम पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
इस्लामपूर शहरात मटका, जुगार यांसह देशी बनावट दारु, पावडर पान, गुटखा मोठ्या प्रमाणात विक्री केला जात आहे. या प्रश्नी जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन देवून भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. भाजप महिला पदाधिकाऱ्यांवर आत्मदहनासारखी वेळ असेल तर ही गंभीर बाब आहे. तरी हे अधिकारी वरिष्ठांची दिशाभूल करीत पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे नसल्याच्या अर्विभाव आणत आहेत. कुरळप, आष्टा या पोलीस ठाण्यातील अवैध धंदे करणाऱ्यांसाठी इस्लामपूर पोलीस ठाणे सोयीचे बनले आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२-१४ किलो मिटर अंतर असणाऱ्या ओझर्डे व धबकवाडी येथे तेलंगण राज्यातून सुमारे २८ किलो गांजा विक्रीसाठी आणला जात आहे..
जिल्हयाच्या ठिकाणी असलेल्या एलसीबी पथकाला याची खबर लागते. परंतु येथील पोलीस ठाण्याला काही माहिती नाही, याचा अर्थ असा की, तेलंगणातील ही माणसाला माहिती आहे की, इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांसाठी योग्य कार्यक्षेत्र आहे, असा आरोप ही विक्रम पाटील यांनी केला. हे अवैध धंदे बंद होण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांसह पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. यावेळी भाजपाचे भास्कर पाटील, अशोक पाटील, शिवाजी पाटील, कपिल सुर्यगंध उपस्थित होते.








